World Cup : तिकीट १२०० चे, विकले १२ हजारांना, दोघांना अटक

मिररने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही तासात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मुकाई चौक, रावेत येथे कारवाई केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 20 Oct 2023
  • 05:33 pm
World Cup : तिकीट १२०० चे, विकले १२ हजारांना, दोघांना अटक

तिकीट १२०० चे, विकले १२ हजारांना, दोघांना अटक

भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार वृत्तानंतर पोलिसांची कारवाई

रोहित आठवले

भारत विरुद्ध बांगलादेश दरम्यान गहुंजे येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्याचे १२०० रुपयांचे तिकीट तब्बल १२ हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मिररने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अवघ्या काही तासात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेअंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मुकाई चौक, रावेत येथे कारवाई केली.

तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना तिकिटे पुरवणाऱ्या त्यांच्या साथीदाराच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिकेट विश्वचषकाचे सामने पुण्यामध्ये २७ वर्षांनंतर होत असताना भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अनेक चाहत्यांनी आपली खदखद सोशल मीडियावरून व्यक्त केली होती. मॅच सुरू होण्याच्या काही तास आधीपासून अनेक चाहत्यांनी क्रिकेटची तिकिटे मैदानाच्या बाहेर मिळतात का, हे पाहण्यासाठीही गर्दी केली होती. परंतु, तिकिटे केवळ ऑनलाईनच उपलब्ध होतील, हे बीसीसीआय आणि एमसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते, तर ऑनलाईनदेखील तिकिटांचा काळाबाजर होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

सध्या क्रिकेट वर्ल्डकपचे सामने देशभरात खेळविले जाणार आहेत. त्यातील पाच सामने गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहेत. त्यापैकी भारत विरुद्ध बांगलादेश हा पहिला सामना आज (१९ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजता येथे सुरू झाला. त्यानंतरच्या चार सामन्यांमध्ये भारताचा एकही सामना नाही. भारताचा सामना असलेली गुरुवारची एकमेव मॅच असल्याने क्रिकेटप्रेमींनी यासाठी तुफान गर्दी केली होती.

याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. साध्या वेशातील पोलीस मागील काही दिवसांपासून स्टेडियम आवारात गस्त घालत आहेत. दरम्यान, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली की, मुकाई चौक, रावेत येथे कोहिनूर सोसायटीच्या समोर काही दलाल क्रिकेट सामन्याची तिकिटे जास्त दराने विकत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून रवी लिंगप्पा देवकर, अजित सुरेश कदम या दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याची १२०० रुपये दराची पाच तिकिटे आढळली. यातील एक तिकीट ते तब्बल १२ हजार रुपयांना विकत होते. पोलिसांनी पाच तिकिटे, ३८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, सात हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५१ हजारांचा ऐवज जप्त केला.

रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने ही तिकिटे पुरवली असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे या तिघांवर रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे आदींनी ही कारवाई केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest