Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’; सोमा गायकवाड टोळीसह २१ जणांवर मोक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०) यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’; सोमा गायकवाड टोळीसह २१ जणांवर मोक्का

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०) यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २० पेक्षा अधिक आरोपींचा समावेश आहे. १ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आंदेकर यांच्यावर त्यांच्या घरासमोर गोळीबार करीत कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकानाचे अतिक्रमण पाडायला लावल्याचा रागातून आंदेकर यांची सख्खी बहिण आणि मेव्हणा यांनी मिळून सराईत गुंड सोमा गायकवाड याच्या मदतीने खून घडवून आणला होता. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी विश्वासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.  

संजीवनी जयंत कोमकर (रा. ३०९, नाना पेठ) जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२), भाचा प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर (३७), कुख्यात गुन्हेगार सोमा ऊर्फ सोमनाथ सयाजी गायकवाड (रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अनिकेत दूधभाते (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम (रा. धनकवडी) सागर पवार (रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ) सॅम ऊर्फ समीर काळे, आकाश म्हस्के, संगम वाघमारे यांच्यासह जवळपास २१ जणांना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय ६८, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. वनराज हे बंडू ऊर्फ सुर्यकांत आंदेकर यांचे पुत्र होते. तर, संजीवनी मुलगी आहे. तिचे जयंत कोमकर सोबत लग्न झालेले असून गणेश कोमकर याचे आंदेकरच्या सर्वात धाकट्या मुलीशी लग्न झालेले आहे. हे दोघेही त्याचे जावई आहेत. तर, वनराजचे सख्खे मेव्हणे आहेत. तर, प्रकाश हा सख्खा भाचा आहे. त्यांच्यामध्ये मागील काही महिन्यांपासून काही विषयांवरून वाद सुरू होते. नुकतेच संजीवनी यांच्या दुकानावर अतिक्रमण कारवाई झालेली होती. ही कारवाई माजी नगरसेवक असलेल्या वनराज यांच्या सांगण्यावरून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केल्याचा संशय संजीवनी, जयंत यांना होता. त्याचा राग देखील या खुनामागे असल्याचे फिर्यादी बंडू आंदेकर यांनी पोलिसांना सांगितले आहे. आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री पिस्तुलातून गोळीबार, तसेच कोयत्याने वार करण्यात आले. त्यावेळी त्यांची बहीण संजीवनी गॅलरीत थांबली होती. तिने हल्लेखोरांना चिथावणी दिली. ‘मारा, मारा. दोघांना सोडू नका,’, अशी चिथावणी तिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपी संजीवनी आणि जयंत यांचे १ सप्टेंबर रोजी आकाश सुरेश परदेशी याच्याशी वाद झाले होते. आरोपी तक्रार देण्याकरीता समर्थ पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी शिवम आंदेकर व वनराज हे देखील पोलीस ठाण्यात गेले. तेथे आरोपी संजीवनी व जयंत यांनी आकाशला मारहाण केली. हे भांडण शिवम यांनी सोडवले. त्यावेळी संजीवनी हिने वनराज यांना 'वनराज... आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामधे आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन  ठोकतेच.' अशी धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवार, २ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा खून करण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच येरवडा कारागृहामधून बाहेर आलेल्या सोमा गायकवाड टोळीची मदत घेण्यात आली. पोलिसांनी रायगड जिल्ह्यामधील माणगाव येथून १३ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर, आकाश म्हस्के याला अटक करून त्याच्याकडून २ पिस्तुले आणि १० जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 

नेमके काय घडले?

वनराज हे त्यांच्या चुलत भावासोबत घराबाहेर गप्पा मारत उभे होते. त्यावेळी सहा मोटार सायकलवरून एकूण १३ तरुण धारदार हत्यारे आणि पिस्तुले घेऊन आले. हल्लेखोर गाडीवरून उतरताच वनराज यांचा चुलत भाऊ पळून गेला. तर, वनराज हे हल्लेखोरांच्या हाती लागले. त्यांच्यावर सुरुवातीला गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून आरोपी पुन्हा त्यांच्या गाड्यांवरून पसार झाले. हा थरार अवघ्या काही क्षणात घडला. दरम्यान, आरोपी पसार होताच स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना जवळच असलेल्या केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो तरुण आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest