एल-थ्री बारमधील पार्टीत एमडी पुरवणारे तिघे अटकेत

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ‘लिक्विड लिझर लाउंज’ (एल-थ्री) बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टीत मेफेड्रोनचा (एमडी) पुरवठा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) अटक केली.

एल-थ्री बारमधील पार्टीत एमडी पुरवणारे तिघे अटकेत

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील ‘लिक्विड लिझर लाउंज’ (एल-थ्री) बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टीत मेफेड्रोनचा (एमडी) पुरवठा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) अटक केली.

अटक केलेल्यांमध्ये एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश असून तिघांच्या अंगझडतीत ‘एमडी’ आणि ‘कोकेन’ हे अमली पदार्थ सापडले आहेत. आरोपी अमली पदार्थांची देवाण-घेवाण करत असून त्यांनी शहरातील कोणकोणत्या हॉटेल-बारमध्ये अमली पदार्थांची विक्री केली आहे, याचा तपास पोलीस करणार आहेत.

अभिषेक अमोल सोनवणे (वय २३, रा. डिझेल कॉलनी, रेल्वे क्वार्टर), ओंकार अशोक सकट (वय २८, रा. महात्मा फुले पेठ) आणि इडोको स्टॅव्हली संडे (रा. नायजेरिया) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यासह (एनडीपीएस), महाराष्ट्र दारूबंदी कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. यू. सुपेकर यांनी हा आदेश दिला.

असे सापडले आरोपी

‘एल-थ्री’ बारमधील मध्यरात्रीच्या पार्टीमध्ये स्वच्छतागृहात दोन तरुण अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. या व्हीडीओत दिसणारे नितीन नथुराम ठोंबरे आणि करण मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली. पार्टीदरम्यान एका व्यक्तीने ‘एमडी’ हा अमली पदार्थ ऑफर केल्याची कबुली ठोंबरे आणि मिश्रा यांनी पोलिसांच्या चौकशीत दिली. या पार्टीत ड्रग्ज देणारी व्यक्ती शिवाजीनगर येथील कामगार पुतळा परिसरात वारंवार येत असते, असे मिश्रा याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून अभिषेकला अटक केली. त्याच्या खिशातून एक ग्रॅम कोकेन पोलिसांनी जप्त केले. अभिषेकने हे कोकेन ओंकार आणि इडोकोकडून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर महात्मा फुले पेठेतून ओंकार आणि इडोकोला अटक केली. त्यावेळी ओंकारकडे सहा-सात ग्रॅम ‘एमडी’ची पावडर आणि इडोकोकडे २.८ ग्रॅम कोकेन सापडले, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest