पुणे: हडपसरमध्ये तोतया पत्रकारावर खंडणीचा गुन्हा

हडपसरमधील एका तोतया पत्रकाराने पोलीस असल्याची बतावणी करून ऑईल टँकरचालकाकडे १० लाखांची खंडणी मागत तडजोडअंती अडीच लाख घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. २८) पहाटे अडीच ते सकाळी आठच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल नाक्याजवळ घडला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 1 Jul 2024
  • 12:53 pm
Fake Journalist, Hadapsar, Pune Crime News, Pune Police

संग्रहित छायाचित्र

पोलीस असल्याची बतावणी करत टँकरचालकाकडून उकळले अडीच लाख

हडपसरमधील  एका तोतया पत्रकाराने पोलीस असल्याची बतावणी करून ऑईल टँकरचालकाकडे १० लाखांची खंडणी मागत तडजोडअंती अडीच लाख घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. २८) पहाटे अडीच ते सकाळी आठच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल नाक्याजवळ घडला.

या प्रकरणी तोतया पत्रकारासह त्याच्या दोन साथीदारांवर हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. राहुल मच्छींद्र हरपळे (वय ३५, रा. फुरसुंगी ता. हवेली) असे तोतया पत्रकाराचे नाव आहे. याबाबत बाळू आण्णा चौगुले (वय ४४, रा. चिंचवड) यांच्या फिर्यादीनुसार हडपसर पोलीस ठाण्यात राहुलसह दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हरपळे आणि त्याच्या पत्नीवर खंडणी, दारू विक्री, दारू वाहतूक यासारखे आणखी काही गुन्हे दाखल आहेत. हडपसर भाजी मार्केटमधील एकाला हनी ट्रॅपमध्ये अडकविल्याचा गुन्हाही हरपळेवर दाखल आहे.

फिर्यादी चौगुलेंचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्यांच्या टॅंकरवर अब्दुल शेख हे चालक आहेत. शुक्रवारी पहाटे शेख हे टँकरसह कवडीपाट टोलनाक्यावरून जात असताना, लाल रंगाच्या स्विफ्टमधून आलेल्या तिघांनी टँकर अडविला. गाडीतून उतरलेल्या तिघांनी पोलीस असल्याची बतावणी केली. शेख यांना दमदाटी करत टँकरच्या मालकाला बोलव, अन्यथा पोलीस केस करण्याची धमकी दिली. शेख यांनी ही माहिती बाळू चौगुले यांना फोनवरून कळवली. त्यानंतर बाळू चौगुले, सुदीप अवघडे अडीच वाजण्याच्या सुमारास टोल नाक्याजवळ पोहोचले.

टोल नाक्याजवळ पोहोचताच, बाळू चौगुले यांनी स्विफ्टमधील दोघांची भेट घेतली. टँकर अडवण्याचे कारण विचारले असता, तुमच्या टँकरमधून फर्नेस ऑईलची वाहतूक केली जात असून, त्यासाठी तुमच्यावर केस करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावर घाबरलेल्या चौगुले यांनी केस न करण्याची विनंती करताच, टँकर सोडण्यासाठी दहा लाखांची मागणी केली. पैसे दिले नाही तर जिवे मारण्याचीही धमकी दिली. घाबरलेल्या चौगुले यांनी अडीच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. मात्र, पैसे जवळ नसल्याने तासाभराची सवलत मागितली. यावर चौगुले यांना ९२८४६६११४४ हा मोबाईल नंबर देऊन, दोघेही निघून गेले.

तासाभरानंतर पैसे जमा होताच चौगुले यांनी दोघांना अडीच लाख घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर चौगुलेंनी ॲपवर पाहणी केली असता तो नंबर राहुल हरपळेचा असल्याचे दिसून आले. तसेच हरपळे हा पोलीस नव्हे, तर न्यूज प्रहार या बोगस यूट्यूब चॅनेलचा कथित पत्रकार असल्याचे लक्षात आले. मात्र, भीतिपोटी चौगुले यांनी हरपळेला गुलमोहर मंगल कार्यालयाजवळ अडीच लाख दिले. तसेच ही बाब हडपसर पोलिसांत जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी हरपळे व दोन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest