Pune Crime : गणेशोत्सव संपताच चोरटे 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर

गणेशोत्सव संपताच चोरट्यांनी शहरामध्ये पुन्हा सक्रिय होत धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. चोरट्यांनी सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या एकाच सोसायटीमधील तीन फ्लॅटमध्ये घरफोड्या केल्या असून बाणेर भागातील एक, लोणी काळभोर परिसरातील दोन दुकाने फोडली. तर, स्वारगेट परिसरातील एका सदानिकेत हात साफ केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 7 Oct 2023
  • 03:16 pm
Pune Crime

गणेशोत्सव संपताच चोरटे 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर

सिंहगड रस्ता, बाणेर आणि लोणी काळभोर परिसरातील दुकाने आणि फ्लॅटमध्ये घरफोड्या

लक्ष्मण मोरे

गणेशोत्सव संपताच चोरट्यांनी शहरामध्ये पुन्हा सक्रिय होत धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. चोरट्यांनी (Pune Crime) सिंहगड रस्ता परिसरात असलेल्या एकाच सोसायटीमधील तीन फ्लॅटमध्ये घरफोड्या केल्या असून बाणेर भागातील एक, लोणी काळभोर परिसरातील दोन दुकाने फोडली. तर, स्वारगेट परिसरातील एका सदानिकेत हात साफ केला. या सर्व ठिकाणी हात सफाई करीत  लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यामध्ये नारायण आत्माराम राठोड (वय ३०, रा. रागिनी विहार सोसायटी, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. राठोड हे रागिनी विहार सोसायटी मधील फ्लॅट नंबर १४ मध्ये राहण्यास आहेत. अज्ञात आरोपीने गुरुवारी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडले. घरामध्ये प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातून एक लाख ६१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच, त्यांच्या सोसायटीमधील फ्लॅट नंबर १३मध्ये राहणाऱ्या किशोर आहेर यांच्या घरामधून आठ हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि सिद्धेश धुमाळ यांच्या फ्लॅट नंबर १६मधून २२ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. पोलिसांनी या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

यासोबतच चतु:शृंगी पोलीस  ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाणेर स्ट्रीट इमारतीमध्ये चोरट्यांनी ऑफिस फोडून ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी रोहित दत्तात्रय गडसिंग (वय ३३, रा. साई आर्केड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. गडसिंग यांचे बाणेर स्ट्रीट बिल्डिंगमध्ये डी मार्ट समोर कार्यालय आहे. चोरट्यांनी या ऑफिसचा दरवाजा तोडला.  ऑफिसमध्ये घुसून एसीचा तांब्याचा पाईप, जग्वार कंपनीचे पाण्याचे नळ, हार्डवेअरचे ॲल्युमिनियमचे पाईप, इलेक्ट्रिकलचे प्लास्टिकचे बोर्ड आणि वायर असा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तर, लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये विठ्ठल शामराव गोठे (रा. माळवाडी, कुंजीरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या कुंजीरवाडी येथील अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये गोठे यांचा गाळा आहे. अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाचे शटर उचकटले. दुकानामधून ७० हजार रुपयांच्या बूट चप्पल आदी मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.

तर उरुळी कांचन येथील एम जी रस्त्यावर असलेल्या एस एम मोबाईल शॉपीचे शंटर उचकटून चोरट्याने ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी शुभम रामचंद्र महाडिक (वय २५, रा. शिंदवणे) यांनी फिर्याद दिली आहे. यासोबतच स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या शंकर शेठ रस्त्यावरील आनंद पार्क सोसायटीमध्ये देखील चोरट्यांनी हात साफ केला. या सोसायटीमधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी एक लाख ८५ हजार रुपयांचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. पुणे सातारा रस्त्यावर असलेल्या शंकर महाराज मठासमोरील रॉयल आर्केड सोसायटीमधील श्रीहरी व्हेज हॉटेलच्या गेट समोर फुटपाथवर पार्क केलेल्या दुचाकीमधून एक लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रक्कम चोरट्यांनी लंपास केली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest