पुणे : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा उच्छाद महिलांच्या दागिन्यांची चोरी : गुन्हे शाखेने घेतले ३० जण ताब्यात

पालखी सोहळ्यात चोरट्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. या सोहळ्यादरम्यान मोबाईल व मौल्यवान ऐवज चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात आणि नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर परिसरात तैनात करण्यात आलेली होती.

Pune Crime

पुणे : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा उच्छाद महिलांच्या दागिन्यांची चोरी : गुन्हे शाखेने घेतले ३० जण ताब्यात

पुणे : पालखी सोहळ्यात चोरट्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. या सोहळ्यादरम्यान मोबाईल व मौल्यवान ऐवज चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात आणि नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर परिसरात तैनात करण्यात आलेली होती. या मंदिराच्या परिसरामधून तसेच दर्शन रांगेमधून पोलिसांनी ३० संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेतले. यामध्ये चार महिलांचा देखील समावेश आहे. दरम्यान, लहान मुलांना खांद्यावर बसवून त्यांना महिलांच्या गळ्यातील मौल्यवान ऐवज चोरण्यास सांगण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. या सोहळ्यात तीन महिलांचे दागिने चोरून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले. गुरुवार पेठेत राहणाऱ्या या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि तिची सून मैत्रिणीसह श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी श्री पालखी विठोबा मंदिरात गेली होती. दुपारी अडीचच्या सुमारास दर्शन रांगेत असतानाच चोरट्यांनी हात साफ करीत त्यांच्या गळ्यातील ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. 

नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिर परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ५२ हजारांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. ही महिला श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हे मंगळसूत्र लांबवले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत. तर, तिसरी घटना विश्रांतवाडीतील मनोरुग्णालय चौकात घडली. याठिकाणी पालखीचे दर्शन घेत असताना येरवडा येथील नागपूर चाळ परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पडकण्यात आलेल्या आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याकडे तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest