वाढदिवसाचा केक नाकारल्याने तरुण चिडला, तरुणीला घरात घुसून मारहाण
एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुणीला केक पाठविला. मात्र, तरुणीने केक न घेतल्याने चिडलेल्या तरुणाने तिला घरात घुसून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरातील एका सोसायटीत घडली आहे. या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अंकित सिंग (वय ३१, रा. केशवनगर, मांजरी रस्ता) याच्याविरुद्ध मारहाण, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी कोंढव्यातील उंड्री परिसरातील एका सोसायटीत राहते. अंकित तिच्यावर एकतर्फी प्रेम करतो. तरुणाने तरुणीच्या वाढदिवसाला तिच्या घरी केक पाठवला. तरुणीने केक नाकारला. त्यामुळे तरुण चिडला आणि तरुणी राहत असलेल्या सोसायटीत जाऊन त्याने तरुणीला मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला.
दरम्यान, या अगोदर देखील तरुणाने तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, तरुणीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या क्रमांकावरून तरुणीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अकेर वाढदिवसाच्या केकवरून झालेल्या मारहाणीनंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.