संग्रहित छायाचित्र
मोईगावला जायचे आहे, असे सांगून तिन ते चार तरुण रिक्षात बसले. त्यानंतर रिक्षाचालकाला मारहाण करून लुटले. तसेच प्रवाशी रिक्षाही पळवली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी सकाळी ९ ते साडेनऊच्या सुमारास पिंपरी चिंचवडमधील चिखली ते मोईगावच्या दरम्यान घडला. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विशाल मोरे (रा. चिखली गाव) याच्यासह त्याच्या इतर तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित रिक्षाचालक धनंजय सुनिल चौधरी (वय ३९, रा. बोऱ्हाडेवस्ती, कांदा मार्केट जवळ, मोशी, पुणे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास रिक्षा चालक धनंजय चौधरी हे त्यांची एम.एच.१२ / के.आर. ५०७३ या क्रमांकाची रिक्षा घेवून चिखली गाव कमानी जवळील रिक्षा स्टँडमध्ये उभे होते. यावेळी आरोपी विशाल आणि त्याचे तीन मित्रांनी धनंजय यांना मोईगाव येथे जायचे आहे असे सांगुन त्यांच्या रिक्षामध्ये बसले.
त्यानंतर धनंजय हे आरोपींना मोईगावच्या दिशेने घेवून जात असताना पाठीमागे बसलेल्या आरोपी व त्याचे मित्रांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिविगाळ केली. तसेच त्यांचा ५ रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि ७० हजार रुपये किमतीची रिक्षा जबरदस्तीने चोरी करुन पळवून नेली. या प्रकरणी धनंजय यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर आरोपींविरोधात कलम ३९४, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.