पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून चोरी, अवघ्या ३ तासात पोलीसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
लोणावळा, वरसोली, मळवली, कार्ला भाजे परीसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून चोरटा मौल्यवान वस्तू चोरून नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, घटनेची माहिती मिळाताच पोलीसांनी अवघ्या तीन तासाच्या आता चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. लोणावळा ग्रामीण पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
अखिल सलीम व्होरा (वय ३२, रा. नुतननगर अमिना मंजील जवळ, आनंद, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी चोरट्याने नाव आहे. त्याच्याकडून तब्बल १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा, वरसोली, मळवली, कार्ला भाजे परीसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. शनिवार (दि. १९) वरसोली परीसरातील पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून गाडीतील मौल्यवान अज्ञात चोरटा चोरून नेत असल्याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीसांत दोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
आरोपीचा शोध घेत असताना पोलीसांनी वरसोली येथील सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली. यात इनोव्हा कारमधील ३० ते ३५ वर्ष वयाचा इसम चारचाकी गाडीची काच फोडून चोरी करताना दिसून आला. त्यानुसार शोध घेतला असता लोहगड परिसरात इनोव्हा कार नंबर GJ 06 FC 3806 मधून आरोपी फिरत असल्याचे दिसून आले. आरोपी दिसताच पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या गाडीमध्ये सीमकार्ड नसलेले एकुण ८ मोबाईल, तसेच ५ पर्स, २ बॅगा, २ पॉवर बँक, २ घड्याळ, २२ हजार ९०० रुपये रोख रक्कम आणि इनोव्हा कार असा एकुण १२ लाख ११ हजार १०० रुपये मुद्देमाल मिळून आला. त्याच्यावर कलम ३७९, ४२७, नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत आरोपीला पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.