पोलीसांनी अवघ्या ४८ तासात लावला घटनेचा छडा, नितीन म्हस्के हत्याप्रकरणी १७ जणांना अटक
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मंगला चित्रपटगृहाजवळ मंगळवारी (दि. १५) रात्री नितीन म्हस्के नावाच्या तरुणाचा दहा ते बारा जणांच्या टोळक्यांनी सपासप वार करून खून केला होता. या प्रकरणाने परिसरात खळबळ माजली होती. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला घेऊन पुणे पोलीसांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. मात्र, पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत या प्रकरणाचा अवघ्या ४८ तासाच छडा लावला आहे. नितीनच्या खुनात सहभागी असणाऱ्या तब्बल १७ जणांना पोलीसांनी पुण्यासह विविध राज्यातून अटक केली आहे.
सागर ऊर्फ यल्ल्या ईराप्पा कोळानट्टी (वय ३५), सुशिल अच्युतराव सुर्यवंशी (वय २७), शशांक ऊर्फ वृषभ संतोष बेंगळे (वय २१), गुडगप्पा फकीरप्पा भागराई (वय २८), एक विधिसंर्घषीत बालक, मलेश ऊर्फ मल्ल्या शिवराज कोळी (वय २४), किशोर संभाजी पात्रे (वय २०), साहिल उर्फ सल्ल्या मनोहर कांबळे (वय २०), गणेश शिवाजी चौधरी (वय २४), रोहित बालाजी बंडगर (वय २०), विवेक ऊर्फ भोला भोलेनाथ नवघरे (वय २५), इम्रान हमीद शेख (वय ३१), आकाश ऊर्फ चड्डी सुनिल गायकवाड (वय २२), लॉरेन्स राजु पिल्ले (वय ३६), मनोज उर्फ बाबा विकास हावळे (वय २३), रोहन उर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय २३) आणि विकी उर्फ नेप्या काशीनाथ कांबळे (वय २२, रा. सर्व ताडीवाला रोड, पुणे) अशी अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मंगळवारी रात्री सागर आणि त्याच्या साथीदारांनी म्हस्केचा काटा काढल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. नितीन म्हस्केच्या हत्येनंतर त्याचा मित्र सतिश आनंदा वानखेडे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलीसांनी आरोपींनी कलम ३०२, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट ४/२५, महा पो अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, आरोपी पुण्यातून पसार झाल्यानंतर पोलीसांच्या गुन्हे शाखेने युनिट १, युनिट - २, खंडणी विरोधी पथक १, दरोडा व वाहन चोरी पथक - १ असे गुन्हे शाखेकडील ०६ पथके तयार केली होती.
गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत असताना गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर उर्फ यल्ल्या हा व त्याचे साथीदार हे लातुर, सोलापुर, कोल्हापुर, पुणे ग्रामीण, पुणे शहर परिसरात तसेच कर्नाटकातील रायचुर, बेळगावमध्ये असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच युनिट १ च्या पथकाने ५ जणांना कर्नाटकातील बेळगाव येथील रायचुर येथून तर ५ जणांना पुण्यातील विश्रांतवाडी येथून अटक केली. तसेच खंडणी विरोधी पथक युनिट १ ने २ जणांना पुण्यातील मुंढवा परिसरातून अटक केली. त्याचबरोबर दरोडा आणि वाहन चोरी विरोध पथक १ ने एकाला पुण्यातील खडकवासला परिसरातून अटक केली. याशिवाय, युनिट २ च्या पथकाने पुण्यातील खराडी परिसरातून चार जणांना अटक केली आहे.
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे म्हणाले की, “पुण्यात झालेल्या नितीन म्हस्के या तरुणाच्या हत्ये प्रकरणी ४८ तासांमध्ये १७ आरोपींना अटक केली आहे. पूर्ववैमन्यास्यातून आणि वर्चस्व वादातून म्हस्के याची पुण्यातील मंगला टॉकीजच्या बाहेर बुधवारी रात्री बारा ते चौदा जणांनी मिळून तलवार, पालघन, लोखंडी गज असे धारधार हत्याराने हत्या केली होती. हत्येनंतर हे सगळे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फरार झाले होते. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या सर्व आरोपींना लातूर, सोलापूर, कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव, रायचूर या ठिकाणी जाऊन सापळा रचून अटक केली. यातील चार आरोपींना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.”