पुण्यातून फरार झालेल्या तिसऱ्या संशयित दहशतवाद्याचा फोटो आला समोर
पुण्यातील कोथरूडमधून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असताना त्यांना अटक कोथरूड भागातून अटक करण्यात आली होती. मात्र, यातील तिसरा आरोपी फरार झाला होता. आता फरार झालेल्या तिसऱ्या संशयित दहशतवाद्याचा फोटो पोलीसांच्या हाती लागला आहे. एटीएसकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र, त्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही.
शहानवाज आलम असे तिसऱ्या दहशतवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या अगोदर अटक करण्यात आलेल्या महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्यप्रदेश) या दोन संशयित दहशतवाद्यांना देखील शहानवाज याने लॉजिस्टिक मदत केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अटकेत असलेल्या दोन आरोपींच्या घराची दहशतवाद विरोधी पथकाने तपासादरम्यान झडती घेतली. त्यामध्ये विविध वस्तू आढळून आल्या. त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पांढरी पावडर सापडली होती. ती पावडर स्फोटके असल्याचे एक्स्प्लोसिव्ह वेफर डिटेक्टरमध्ये स्पष्ट झाले आहे. तसेच पोलिसांच्या डॉग स्कॉडने देखील यासंबंधी पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला आहे. ही पावडर नेमके कोणते स्फोटके आहे, त्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविला असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या दोघांना ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर तिसऱ्या संशयित दहशतवाद्याचा एटीएसकडून तपास सुरू आहे.