पुणे : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळत असताना लोहगावातील एका ११ वर्षीय मुलाच्या गुप्तांगावर बॉल लागल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. अवघ्या ११ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने लोहगावावर शोककळा पसरली आहे.

Pune Crime News

पुणे : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू

पुणे : क्रिकेट खेळत असताना लोहगावातील एका ११ वर्षीय मुलाच्या गुप्तांगावर बॉल लागल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. अवघ्या ११ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने लोहगावावर शोककळा पसरली आहे. (Pune Crime News)

शौर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (Shory Khandve) (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंभू हा सहावीमध्ये शिक्षण घेत होता. वार्षिक परीक्षा झाल्याने त्याला शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या होत्या. सुट्ट्यांमध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद त्याच्यासह त्यांच्या कुटुंबातील भावंडासोबत घेत होता. गुरुवारी रात्री ७ ते ९ वाजण्याच्या दरम्यान तो लोहगावमधील जगद्गुरू पोर्ट्स अकॅडमी मैदानात  क्रिकेट खेळत होता. शंभूला खेळताना अचानक पुढून येणारा बॉल गुप्तांगावर लागला. त्यावेळी अचानक तो मैदानात कोसळला. त्यानंतर तो पुन्हा उठून उभा राहिला. मात्र बॉलच्या वेगामुळे त्याला असह्य वेदना झाल्याने तो काही क्षणात पुन्हा खाली कोसळला. शंभू कोसळल्याने त्याच्या सोबत खेळत असणारी भावंडे गोंधळून गेली. शंभूची अवस्था बघून त्यांनी आरडाओरडा केल्याने जवळच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नागरिकांनी शंभूला खासगी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी शंभूचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे पोलिसांनी मिररला सांगितले.

शंभूच्या घरी दोन बैल जोड्या आहेत. त्याचे बैलांवर खूप प्रेम होते. तसेच त्याला बैल गाडा शर्यतीची आवड होती. त्याच्या जाण्याचे दु:ख या मुक्या प्राण्यांना झाले असून त्यांनी दोन दिवसांपासून काही खाल्ले नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. शंभू हा कुस्तीपटू होता. त्याला कोल्ड कॉफी खूप आवडत होती. शंभूच्या मामाचे लग्न असल्याने त्याला लग्नात घालण्यासाठी नवीन कपडे खरेदी केले होते. मामाच्या लग्नात मजा मस्ती करण्याचे त्याने ठरवले होते. मात्र नियतीच्या मनात ते नसल्याने त्याला अवघ्या ११ व्या वर्षी काळाने हिरावून नेले.  शंभूच्या अचानक जाण्यामुळे खांदवे कुटुंबीयांसह लोहगाव व परिसरात शोककळा पसरली आहे. शंभू हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांचा पुतण्या होता. बंडू यांना शंभूबदद्ल बोलताना अश्रू अनावर झाले. दु:खचा डोंगर कोसळलेला असताना देखील त्यांनी सर्वच पालकांना आपल्या मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले. मुलांनी अंतर्गत संरक्षण कवच घालण्याविषयी जागरूक राहण्याची गरज माझ्या घरातील माझ्या चिमुकल्या पुतण्यासोबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यातून धडा घेत प्रत्येक पालकांनी मुलांना खेळायला सोडताना संरक्षक साधनांचा वापर करण्यासाठी सूचना देणे अत्यंत आवश्यक आहे. शौर्य हा कुस्तीपटू  होता. खेळण्याच्या वयात खेळातूनच त्याचा मृत्यू व्हावा हे दु:ख प्रचंड मोठे आहे. त्यामुळे पालकांनी सध्याच्या उन्हामध्ये मुलांकडे खेळायला सोडताना अधिक लक्ष द्यावे. असे आवाहन शंभूचे काका बंडू खांदवे यांनी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest