पिंपरी-चिंचवड : रजा घेऊन बाहेर आले अन् गायब झाले

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना रजा घेऊन बाहेर पडता येते. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले पाच बंदी रजा घेऊन कारागृहातून बाहेर पडले. मात्र, ते पुन्हा कारागृहात हजर न होता फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

कारागृहातून बाहेर पडलेले बंदी झाले फरार, रजा संपल्यावरही बंद्यांची घरवापसी नाही

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना रजा घेऊन बाहेर पडता येते. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले पाच बंदी रजा घेऊन कारागृहातून बाहेर पडले. मात्र, ते पुन्हा कारागृहात हजर न होता फरार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. (Pimpri Chinchwad Crime)

एखाद्या गुन्ह्यात शिक्षा लागल्यानंतर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध कारणांसाठी संचित (हक्काची) आणि फर्लो (अभिवचन) रजा मंजूर करण्यात येते. या रजेचा कालावधी संपल्यानंतर त्या कैद्याने पुन्हा कारागृहात परत जायचे असते. कैद्याच्या रक्ताच्या नात्यातील कोणी आजारी असेल किंवा जवळची व्यक्ती मृत पावली असेल तर अशा वेळी त्या कैद्याला रजा मिळते. गुन्हा शाबित होऊन न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कैद्याची तुरुंगात रवानगी होते. विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोल (संचित रजा) आणि फर्लो (अभिवचन रजा) नावाच्या सुट्ट्यांवर तुरुंगाबाहेर जायला मिळते.

किमान एक वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर या कैद्याचे तुरुंगातील वर्तन चांगले असेल तर तो पॅरोल (संचित) रजा घेण्यास पात्र होतो. कारागृह प्रशासन कैद्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवतात. विभागीय आयुक्त त्या अर्जाची गंभीरता विचारात घेऊन संबंधित कैदी ज्या जिल्ह्याचा रहिवासी असेल त्या जिल्ह्याच्या गुन्हे शाखेकडे अभिप्रायासाठी पाठवतात. गुन्हे शाखेकडून अर्जात नमूद केलेले रजेचे कारण खरे आहे का याची तपासणी करून अभिप्राय पाठवतात.

रजेचा कालावधी

संचित रजेचा कालावधी १५ दिवसांचा असतो. तर पॅरोल रजेचा कालावधी एक महिन्याचा असतो. कालावधी पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणेकडे अर्ज करून पुन्हा रजा वाढवून घेता येते.

अभिवचन रजेवरून एक बंदी फरार

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सांगवी पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये दाखल गुन्ह्यात एका संशयिताला शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, हा बंदी अभिवचन रजेवर कारागृहातून बाहेर पडला. मात्र, रजा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही तो कारागृहात न परतल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

संचित रजा घेऊन चार बंदी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सांगवी, निगडी आणि पिंपरी या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमधील चार संशयितांना शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना संचित रजेवर कारागृहातून बाहेर सोडण्यात आले. मात्र, रजा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते परतले नाहीत. त्यामुळे त्यांना फरार बंदी घोषित करण्यात आले आहे.

गुन्हे शाखा ‘अलर्ट’

पिंपरी-चिंचवड पोलिसांची गुन्हे शाखा अलर्ट झाली असून, फरार संशयित आणि बंद्यांच्या शोधासाठी पथके नियुक्त केली आहेत. यात तांत्रिक विश्लेषणासह खबऱ्यांनाही पोलिसांनी कामाला लावले आहे.

गुन्हा घडल्यानंतर गायब

काही संशयित हे गुन्हा घडल्यानंतर गायब होतात. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जातो. मात्र, तरीही ते पोलिसांच्या हाती लागत नाहीत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दाखल विविध गुन्ह्यांतील असे २३ संशयित फरार आहेत. न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे. यात तब्बल ३० वर्षांपूर्वी घडलेल्या गंभीर गुन्ह्यांतील काही संशयित आहेत. तसेच चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा प्रकरणातील गुन्ह्यातील नेपाळचे पाच संशयित फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. मात्र, त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील एप्रिल २०२४ अखेर फरार संशयित

पोलीस ठाणे फरार संशयित

भोसरी                          ३

भोसरी एमआयडीसी          २

आळंदी                          २

वाकड                          २

देहूरोड                          ५

सांगवी                          १

पिंपरी                          २

हिंजवडी                          १

चिखली                          ५

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest