'मेफेड्रोन'चा बाजार सध्या तेजीत; गांजा ओढणाऱ्यांची संख्या वाढली
लक्ष्मण मोरे
शांत, सुसंस्कृत पुणे शहरामध्ये अंमली पदार्थांची छुपी आणि उघड तस्करी सध्या जोमात असून या बाजारात सध्या 'मेफेड्रोन' अर्थात 'एमडी' नावाचा अमली पदार्थ तेजीत आहे. या पदार्थाच्या सेवनाने लैंगिक क्षमता आणि उत्तेजना वाढत असल्याची चर्चा असल्याने तरूणांमधून या ड्रगला सर्वाधिक मागणी आहे. सध्या 'मेफेड्रोन'ची जोरात चलती असून महाविद्यालयीन आणि आयटीतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्याच्या आहारी जाऊ लागले आहेत. या तस्करीला लगाम घालायचा असल्यास पोलिसांनी इच्छाशक्ती दाखवणे क्रमप्राप्त बनले आहे. चालू वर्षात पुणे पोलिसांनी तब्बल ७ कोटी रुपयांचे 'मेफेड्रोन' जप्त केले आहे. त्यामुळे 'मेफेड्रोन' ही ड्रग तस्करांसाठी चलनी नोट ठरली आहे. यासोबतच गांजाची सहज उपलब्धता होत असल्याने त्याच्याही मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. विशेषत: 'आयटी' क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून गांजाची मागणी वाढली आहे.
'मेफेड्रोन'च्या सेवनाची एकदा सवय जडली की ती सहसा सुटत नाही. विशेषत: तरुणींना शीतपेयांमधून दोन तीन वेळा एमडी दिले की त्या त्याच्या आधीन होऊन जातात. त्यांची व्यसनाची भूक भागवण्यासाठी गैरमार्गाला लावले जात असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. सध्या अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक मागणी 'मेफेड्रोन'लाच आहे. साखरेच्या आकाराचे पांढ-या रंगाचे क्रिस्टल्स असलेली 'मेफेड्रोन'ची पावडर पेयांमधून तसेच मद्यातून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. सध्या चार ते पाच हजार रुपये प्रती ग्रॅम या दराने एमडी विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुद्ध 'मेफेड्रोन'ची किंमत २० हजार रुपये प्रती ग्रॅम आहे. स्थानिक 'ड्रग पेडलर्स' यामध्ये भेसळ करून कमी किमतीत त्याची विक्री करतात. मेफेड्रोनची तस्करी सर्वात पहिल्यांदा फ्रान्समध्ये २००७ साली पकडण्यात आली होती. पोलिसांनी पकडलेली एक कॅप्सूल तपासणीस दिल्यावर या अमली पदार्थाची ओळख समोर आली. सध्या युके, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमध्ये त्याची सर्वाधिक विक्री केली जाते. हेच लोण आता भारतात पसरू लागले आहे.
पुण्यामध्ये तीन दिवसांपासून गाजत असलेल्या ललित पाटील पलायन प्रकरणाच्या मुळाशी देखील 'मेफेड्रोन'चीच तस्करी आहे. तब्ब; दोन कोटींच्या 'मेफेड्रोन'च्या तस्करीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पाटील पसार झाला. तूर्तास तरी 'मेफेड्रोन' भोवती तस्करीचे वर्तुळ फिरत असल्याचे चित्र आहे. हे 'मेफेड्रोन' भारतातील काही केमिकल कंपन्यांमध्ये तयार होते. पुण्यात मुंबईमधून सर्वाधिक आयात होते. त्यापाठोपाठ गोव्यामधून ते आणले जाते. स्थानिक हस्तकांमार्फत त्याच्या वितरणाची व्यवस्था लावण्यात येते. मेफेड्रोनचे अनेक साईड ईफेक्ट देखील तरूणांवर होत आहेत.
कोणते ड्रग प्रामुख्याने येते कुठून?
>>मेफेड्रोन - मुंबई, गोवा
>>गांजा : कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश
>>ब्राऊन शुगर - अफू - अफीम : राजस्थान, मध्यप्रदेश
>>कोकेन : नायजेरिया, युगांडा, घाणा आदी देशातून समुद्रमार्गे किंवा विमानाने
'लोअर क्लास तो अप्पर क्लास' सर्वांची मागणी गांजाला
झोपडपट्टीतील मुलांमध्ये गांजा, चरस अशा अंमली पदार्थांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचा सर्वसाधारण समज आहे. परंतु, आर्थिकदृष्ट्या संपन्न घरातील१५ ते २६ वयोगटातील मुलांमध्ये गांजा, चरस, ब्राऊनशुगर, मद्य अशा विविध प्रकारच्या व्यसनांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे वास्तव समोर आले आहे. यासोबतच आयटी क्षेत्रात काम करणारे, 'लेट नाईट' नोकरी करणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्येही गांजा आणि तत्सम व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांनी चालू वर्षात दोन कोटी ८ लाखांचा १०३८ किलो गांजा जप्त केला आहे. गांजा हा सहज उपलब्ध होणारा अमली पदार्थ आहे. त्यांची देशांतर्गत तस्करी होते.
शाळकरी मुलांमध्ये व्हाईटनर, व्हेंसेडील, पॉलिश लिक्विडच्या सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. त्यांचे कौमार्य आणि तारुण्य या व्यसनांमुळे कुस्करले जात आहे. हे पदार्थ रुमालात घेऊन त्याचा सतत वास घेत राहिल्याने त्यांना नशा होते. त्यामुळे शाळांमधून मुलांच्या वारंवार रक्त तपासण्या करण्याची तसेच समुपदेशनाचीही आवश्यकता आहे. यासोबतच 'स्टिकर' नावाचा एक अमली पदार्थ मिळतो. हा पदार्थ जिभेवर ठेवल्याने त्याची नशा होत जाते. नायट्रीक्स टॅब्लेट्सही बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. श्रीमंत आणि पांढरपेशी वर्गातील मुलांमध्ये कोकेन, ब्राऊन शुगर, एमडी याचे अधिक आकर्षण आहे.
नशेच्या पदार्थांना 'कोडवर्ड' देण्यात आलेले आहेत. 'ट्रान्स ड्रग'मध्ये मोडणाऱ्या 'स्टॅम्प' नावाचा पदार्थ जिभेवर ठेवला जातो. त्याला ओबामा, लादेन, शिव आदी टोपण नावे देण्यात आलेली आहेत. तर, शुगर क्युब, मशरूम नावानेही काही पदार्थ विकले जातात. यासोबतच कोकेनला चार्ली, मेफेड्रोनला एमडी, म्यावम्याव, एलएसडीला एसिड, पत्ते, मेटेड्रोनला चाची, ग्लास, चरसला हॅश, माचो आणि गांजाला ग्रास, गवत असे 'कोडवर्ड' देण्यात आलेले आहेत.