Pune Crime News : जखमी श्वानाला फरपटत नेऊन घेतला जीव

रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या श्वानाच्या पायाला दोरी बांधून त्याला फरपटत नेत क्रूरता करण्यात आली. या श्वानाचा त्यामुळे मृत्यू झाला. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी लोहगाव वाघोली रस्त्यावर घडली होती.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

मृतदेह फेकला कचराकुंडीत, विमानतळ पोलीस ठाण्यात जाब विचारायला गेलेल्या सामाजिक कार्यकर्तीला शिवीगाळ

रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या श्वानाच्या पायाला दोरी बांधून त्याला फरपटत नेत क्रूरता करण्यात आली. या श्वानाचा त्यामुळे मृत्यू झाला. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी लोहगाव वाघोली रस्त्यावर घडली होती. या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने संबंधितांना जाब विचारायला गेलेल्या सामाजिक कार्यकर्तीला शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी खांदवे नावाच्या एका दुकानदारावर भारतीय न्याय संहिता ३२५, ३५२, ३ (५), प्राणी क्रूरता प्रतिबंधक ११ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला एका खासगी संस्थेत काम करते. त्यांना त्यांच्या बहिणीने एक व्हीडीओ पाठवला होता. त्यामध्ये दोन तरुण एका काळ्या रंगाच्या जिवंत श्वानाला त्रास देत असल्याचे दिसत होते. या श्वानाचे या दोरीने बांधण्यात आलेले होते. या श्वानाला ते रस्त्यावरून फरपटत ओढत नेत असल्याचे व्हीडीओमध्ये दिसत होते.

या व्हीडीओसंदर्भात त्यांनी फेसबुकवरून माहिती काढली. हा प्रकार लोहगाव येथील वाघोली रस्त्यावर असलेल्या कैलास फर्निचर शॉपजवळ घडलेला असल्याचे समोर आले. या महिलेने घटनास्थळी जाऊन या संदर्भात माहिती घेतली. त्यावेळी ‘सेफ ग्लास अॅण्ड पार्टीशन’ या काचेच्या दुकानातील कामगारांकडून त्यांनी माहिती घेतली. त्यावेळी कामगारांनी फिर्यादीला सांगितले की, त्यांच्या दुकानासमोर एक भटके श्वान बसलेले होते. या दुकानाचे मालक असलेल्या खांदवे यांनी त्या श्वानाला तेथून हाकलण्याबाबत सांगितले. त्यावेळी दोन व्यक्तींनी त्याच्या पायाला दोरी बांधली. त्यानंतर, त्याला १०० मीटरपर्यंत रस्त्याने फरपटत नेले. या श्वानाला रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कचराकुंडीजवळ नेऊन टाकण्यात आले. त्यामध्ये सर्व प्रकारात या श्वानाचा मृत्यू झाला. कचराकुंडी जवळ जाऊन पाहिले असता श्वानाचा मृतदेह कुजलेला होता. तसेच त्याचा उग्र वास येत होता.

दुपारी फिर्यादी आणि स्ट्रिट अॅनिमल वॉलेन्टीयर अँड फिडरर गणेश वाघमारे, सुश्मिता, प्रज्ञा, अंकुश, शिजा, निशांत असे सर्वजण पुन्हा घटनास्थळी गेले. त्यावेळी दुकानमालक खांदवे हे देखील तेथे आले. श्वानाबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने ‘मीच दोन कामगारांना श्वान आजारी असल्याने त्याला लांब टाकण्यास सांगितले होते अशी कबुली दिली. त्याने हे प्रकरण ‘तुम्ही पुढे वाढवू नका. येथेच मिटवून टाका. मी पैसे देतो’ असे आमिष दाखवले. याविषयी तक्रार करणार असल्याचे सांगताच त्याने बाचाबाची करून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याविषयी वरिष्ठ निरीक्षक अजय संकेश्वरी म्हणाले की, आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest