Pimpri-Chinchwad Crime: शाळेतील कर्मचाऱ्याने केले अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण

महापालिकेने खासगी संस्थेला चालविण्यास दिलेल्या फुगेवाडीच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील एका कर्मचाऱ्याने अश्लील शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महापालिकेने खासगी संस्थेला चालविण्यास दिलेल्या शाळेतील धक्कादायक प्रकार

महापालिकेने खासगी संस्थेला चालविण्यास दिलेल्या फुगेवाडीच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे शाळेतील एका कर्मचाऱ्याने अश्लील शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच शाळेतील एका विद्यार्थिनीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी याप्रकरणी भोसरी (दापोडी) पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली असून, सरफराज मन्सूर शेख (वय ३२, रा. कोंढवा पुणे) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख हा शाळेतील अॅडमिन ऑफिसमध्ये काम करतो. त्याने ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शाळेतील १३ वर्षीय मुलीने मुख्याध्यापकांना १५ ऑक्टोबर रोजी भेटून शेख याने बॅड टच केल्याचे सांगितले. तसेच माझ्याप्रमाणे १५ वर्षीय एका मुळीबाबत देखील शेख याने असाच प्रकार केल्याचेही पीडित मुलीने मुख्याध्यापकांना सांगितले.

या दोन घटनांबरोबरच शेख याने एका मुलीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केल्याचेही माहिती पीडित मुलीने मुख्याध्यापकांना दिल्यावर त्यांनी तात्काळ भोसरी पोलीस ठाणे गाठून अधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकाराबाबत हकीगत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी शेख याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा सध्या शोध घेतला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने दोनच महिन्यांपूर्वी संबंधित इंग्रजी माध्यमिक शाळा एका खासगी संस्थेला चालविण्यास दिली आहे. या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची निवड आणि भरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेला दिली आहे. तसेच शाळेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविणे ही जबाबदारी देखील संस्थेची असून, दोनच महिन्यांपूर्वी संस्थेकडे कारभार सोपविला असताना वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest