संग्रहित छायाचित्र
तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून पतीने त्याचे चित्रीकरण केले. याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुनावळे येथे घडली. पीडिता आणि सर्व आरोपी हे हिंजवडी आयटी पार्क परिसरातील बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करीत आहेत.
याबाबत ३० वर्षीय पत्नीने ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हा प्रकार रावेत भागात घडल्याने हे प्रकरण तपासासाठी बुधवारी (१६ ऑक्टोबर) रावेत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
अभियंता असणाऱ्या पत्नीने फिर्याद दिल्यानंतर याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत पुनावळे येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. तसेच या अत्याचाराचे अश्लिल चित्रफित तयार केली. ती चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्यही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पत्नीने यास विरोध केला असता तिला शिवीगाळ केली.
पत्नी सध्या ठाण्यातील घरून काम करीत आहे. (वर्क फ्रॉम होम) तिचे आणि पतीचे मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. पूनावळे येथे हा प्रकार घडला तेव्हा सगळेजण एका पार्टीसाठी आले होते. त्यानंतर सलग तीन दिवस पतीने त्याच्या मित्रांबरोबर पत्नीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.