Pune Crime News: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील मुख्य आरोपीची डीएनए चाचणी; २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी २२ ऑक्टोबरपर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी २२ ऑक्टोबरपर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी घटनास्थळी थुंकले होते. हे नमुने पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते. तसेच आरोपी शेखचे रक्त, नखे आणि थुंकीचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. पोलिसांनी बुधवारी न्यायालयात याबाबतची माहिती दिली. मुख्य आरोपी असलेल्या शेख वर यापूर्वीचा भिगवण पोलीस ठाण्यात बलात्कारसह लुटमारीचा गुन्हा दाखल आहे. 

इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर बोपदेव घाटामध्ये तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. घाटात फिरायला आलेल्या पीडित तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखविण्यात आला होता. तिच्या मित्राचे हातपाय बांधून ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला. यासोबतच बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी या दोघांकडे असलेल्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्या होत्या. या तीन आरोपींकडे कोयता, लाकडी बांबू आणि धारदार चाकू होता. मित्राला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला होता. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून त्यांचे रेखाचित्र तयार केले. त्या आधारे तपास सुरू केला. आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली होती.

चंद्रकुमार रवीप्रसाद कनाेजिया (वय २०, रा. उंड्री, कोंढवा) याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. तर, पसार झालेल्या शेखला गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून ताब्यात घेतले. कनोजिया याच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या दोघांच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. शेख, कनोजिया आणि साथीदारांनी केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. तरुणीला धमकाविण्यासाठी त्यांनी कोयत्याचा वापर केला. तिच्याकडील सोनसाखळी, सोन्याचे पेंडट, चांदीची अंगठी त्यांनी चोरली. आरोपींकडून कोयता, तसेच ऐवज जप्त करायचा आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. 

दुचाकी जप्त करायची आहे. शेख गु्न्हा केल्यानंतर पसार झाला होता. या काळात त्याला कोणी आश्रय दिला, यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपींच्या लैंगिक सक्षमतेची चाचणी (पोटेन्सी टेस्ट) करायची असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी युक्तिवादात केली. न्यायालायने युक्तिवाद ग्राह्य धरून शेखला २२ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest