संग्रहित छायाचित्र
ब्ल्यु एक्सप्रेस कंपनीमध्ये चालक आणि वाहक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीतील अॅपल कंपनीचे फोन, आयपॅड तसेच डिजीटल वॉच अशा एकूण ३ लाख ९० हजार ४४५ रुपये किमतीच्या वस्तू चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, पोलीसांनी चोरट्यांना अवघ्या २४ तासात अटक केली आहे. ही कारवाई पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने केली आहे.
अभिजीत अरुन जाधव (वय २६, रा. मुकादम वाडी, कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे) आणि अक्षय संभाजी निंबाळकर (वय २३, रा. मळद, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीसांनी त्यांच्याकडून ३ लाख ९० हजार ४४५ रुपये किमंतीचे ०५ नग अॅपल कंपनीचे आय फोन, ०१ नग अॅपल कंपनीचा आय पॅड व ०३ नग डिजीटल वॉच असा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस गस्त घातल असताना दोन संशयीत इसम पद्मावती ट्रॅव्हल्स पार्कंग जवळ चोरीचे महागडे फोन विक्रीसाठी घेऊन आले असून, ते ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांनी सापळा रचून अभिजीत आणि अक्षयला ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुद्देमाल जप्त करून पोलीसांनी आरोपींची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर आपण ब्ल्यु डार्ट एक्सप्रेस कंपनीचा माल घेवुन जात असतांना प्रवासादरम्यान चोरी केल्याची आरोपींनी कबुली दिली.
तसेच डार्ट ब्ल्यु एक्सप्रेस कंपनीमध्ये चालक आणि वाहक पदावर असल्याची कबूली आरोपींनी दिली. पोलीसांनी आरोपींविरोधात कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी सहकारनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.