संग्रहित छायाचित्र
कार चालवत असताना दुचाकीस्वाराने पाठीमागून हार्न वाजवल्याने वाद झाला. याच रागातून कारचालकाने सहा ते सात सहकाऱ्यांना जमवून दुचाकीस्वार तरुणाच्या वडीलांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पुण्यातील मावळ तालुक्यातील ओझर्डे येथील मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी शिरगाव पोलीसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय ओझरकर, रामदास ओझरकर, लक्ष्मण ओझरकर, भानुदास ओझरकर, तानाजी ओझरकर, अर्जुन ओझरकर आणि शंकर ओझरकर (सर्व रा. ओझर्डे ता. मावळ जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार तरुण अक्षय कुंडलीक पारखी (वय २७, दुकान चिक्की शॉप रा. ओझर्डे ता. मावळ जि. पुणे) याने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय ओझरकर हा त्याची कार चालवत होता. यावेळी पाठीमागून येणाऱ्या अक्षय पारखीने त्याच्या दुचाकीचा हार्न वाजवला. यामुळे दत्तात्रय आणि अक्षयमध्ये वाद झाला. याच वादातून दत्तात्रयने आपल्या सहा ते सात सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांनी हातात काठ्या घेवून परिसरात आरडाओरड करत शिवीगाळ केली.
त्यानतंर टोळके दुचाकीस्वार अक्षयच्या चिक्की शॉपकडे येवु लागल्याचे दिसताच तरुणाने मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये लपण्यासाठी आसरा घेतला. अक्षय हॉटेलमध्ये लपताच आरोपी दत्तात्रयने अक्षयचे वडील कुंडलीक पारखी आणि आईला शिवीगाळ करून दमदाटी केली. तर आरोपी शंकर ओझरकरने वडील कुंडलीक यांच्या कानाखाली मारली. या प्रकरणी शिरगाव पोलीसांनी सातही आरोपींवर कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीआरपीसी ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.