संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांचा जामीन अर्ज लष्कर न्यायालयाने फेटाळून लावला. लष्कर न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले. विविध खात्यांत नोकरी लावण्याच्या आमिषाने ४४ जणांना तब्बल ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दराडे यांना अटक करण्यात आली होती.
नोकरीच्या आमिषानेे फसवणूक केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) हिच्यासह तिचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी ( रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी शैलजा हिला अटक केली होती. तिला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तिने जामीन मिळवण्यासाठी लष्कर न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केला.
मात्र, अर्जदार आरोपीचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग दिसून आला आहे. पैशांच्या देवाणघेवाणबाबतचे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती आले आहे. उमेदवारांकडून पैसे घेतल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी उच्चपदस्थ अधिकारी असून जामीन मंजूर झाल्यास ते तपासास बाधा आणू शकता. गुन्ह्याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे जामीन नाकारण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. नवगिरे यांनी केला. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने दराडे यांचा जामीन अर्ज फेटाळला.