खडकवासला बंधाऱ्याच्या लोंखडी प्लेट चोरल्या, अवघ्या १२ तासात पोलीसांनी चोरटे केले गजाआड
पुण्यातील खडकवासला पाटबंधारे विभागाचे बहुली येथील बंधाऱ्याचे १०८ लोखंडी प्लेट (बर्गे) चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ६ चोरट्यांना पोलीसांनी अवघ्या १२ तासात अटक केली आहे. त्यांच्याकडून लोखंडी प्लेट आणि चोरीसाठी वापरलेली वाहने, असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उत्तमनगर पोलीसांनी केली आहे.
सुरेंद्र चंद्रीका यादव (वय २५, रा. कोंढवे धावडे, पुणे जि. सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश), रामरक्षा धरमराज पासवान (वय ३८, रा. विदयावेली शाळेजवळ, सुस-पाषाण रोड, सुसगाव, पुणे), मुनीराम संतराम यादव (वय ४०, जि. सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश), राहुल अमिरका यादव (वय १९, जि. सिध्दार्थनगर), प्रिन्स ऊर्फ मिथोलेस हरिचंद्र यादव (वय १८, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) आणि प्रदीप आंबिका कनोजिया (वय १८, जि. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) अशी अटक कऱण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला पाटबंधारे विभागाचे बहुली येथील बंधाऱ्याचे १०८ लोखंडी प्लेट चोरीला गेली होती. या प्रकरणाचा तपासणाचा सुरू असताना उत्तमनगर येथील एमईएस गेट येथे पोलीस गस्त घातल होते. यादरम्यान, संशयित महिंद्रा पिकअप गाडीचा मिळून आली. या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या पाणी आडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेट मिळून आल्या.
त्यानुसार, गाडीमालक सुरेंद्र चंद्रीका यादव याला ताब्यात घेवून पोलीसांनी चौकशी केली. या तपासात सुरेंद्र यादव आणि त्याचे इतर ०६ साथीदारांनी बहुली गावाजवळील कोल्हापुरी पध्दीतीच्या बंधाऱ्यावरुन लोखंडी प्लेट चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी सुरेंद्र याच्या इतर पाच आरोपींना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी चोरी केलेले एकूण १२० लोखंडी बर्गेपैकी १०८ लोखंडी बर्गे (प्लेट) जप्त केले. यासोबत चोरी करताना वापरलेले वाहने, असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.