आंध्रप्रदेशातून ४०० किलो गांजाची तस्करी, पळून गेलेल्या आरोपीला बारामतीतून अटक
आंध्रप्रदेशातून ४०० किलो गांजाची तस्करी केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणातील फरार असलेल्या मुख्य आरोपीला पुणे जिल्ह्यातील बारामतीमधून अटक करण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ जुलै रोजी केली आहे.
फिरोज अजीज बागवान (रा. बारामतीत, बारामती, जि. पुणे) असे अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या अगोदर या प्रकरणात आरोपी मताम सीमाद्री रामचंद्र पाडल (रा. गुंद्रमेता, मुंचिंगपुट मंडळ, जि. अलुरी सिताराम राजू, राज्य आंध्रप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेश राज्यातील अलुरी सिताराम राजू जिल्हयातील पदेरू पोलीस स्टेशन हद्दीत २५ जून रोजी पोलीसांनी अवैध गांजाची तस्करी करणारी महिंद्रा XUV 500 ही मधून ४०० किलो वजनाचा गांजा जप्त केला होता. या कारवाईत पदेरु पोलीसांनी आरोपी मताम सीमाद्री रामचंद्र पाडलला ताब्यात घेतले होते. मात्र, आरोपी फिरोज अजीज बागवान हा पळुन गेला होता. त्याच्याविरोधात एनडीपीएस कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी फिरोज बागवान हा बारामती परीसरात असल्याची बातमी ७ जुलै रोजी पोलीसांना मिळाली होती. माहिती मिळाल्याच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारामती परीसरात सापळा लावून फिरोजला अटक केली आहे. सध्या आरोपीस पदेरू पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पदेरू पोलीस करत आहेत.