मनपा पुलाखाली महिलांचा करायचा विनयभंग, पोलीसांनी सापळा रचून केली अटक
पुणे महापालिकेच्या पुलाखालून जाणाऱ्या महिलांचा नराधम पुरूष विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांची छेड काढणाऱ्या नराधमाला पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई शिवाजीनगर पोलीसांनी केली आहे.
लक्ष्मण तुकाराम घोडे (वय ४५, रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी पीडित महिला त्यांच्या घरी जाण्यासाठी महापालिकेच्या पुलाखालून बावधन बसच्या स्टॉपकडे पायी जात होत्या.
मात्र, रात्रीवेळी असल्याने अंधारात एक अनोळखी इसम त्यांच्या अंगावर आला. त्याने महिलेसोबत गैरवर्तन केले. या प्रकरणी पीडित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीसांनी तपास सुरू केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलीसांनी मनपा पुलाखाली रात्री १० ते १२ या दरम्यान सापळा रचून पाळत ठेवली. अशातच आरोपी मनपा पुलाखाली थांबलेला असल्याची पोलीसांना माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीसांनी पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यात घेवून आरोपीची चौकशी केली असता सदरचा गुन्हा आपण केल्याची कबुली आरोपीने दिली. या प्रकरणी आरोपीवर कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.