महिलांनो सावधान, कामाच्या बहाण्याने लुटणारी टोळी झाली सक्रीय
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. टोळक्यांच्या तोडफोडीच्या घटनानंतर आता कामाच्या बहाण्याने महिलांना लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. आमच्या सोबत चला, तुम्हाला काम देतो, असे सांगून जुन्या कात्रज बोगद्याजवळ महिलांना लुटणाऱ्या चार जणांना भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नितीन साहेबराव चव्हाण (वय ३०, रा. सहयोग नगर, विठठलनगर, वारजे माळवाडी, पुणे मुळ रा. तामसा रोड, कृष्णानगर, गल्ली नंबर ५, ता. आर्धापुर, जि. नांदेड), संतोष नागोराव कानोडे (वय २०, रा. सदर मुळ रा. मारुती मंदिरा शेजारी, आहिल्यादेवीनगर, ता. आर्धापुर, जि. नांदेड), सुकलाल बाजीराव गिरी (वय १९, रा. सदर मुळ रा. तामसा रोड, कृष्णा नगर, गल्ली नंबर ५, ता. आर्धापुर, जि. नांदेड) आणि सुनिल नारायण गिरी (वय १९, रा. सदर, मुळ रा. तामसा रोड, विवेकगर, कॅनल जवळ, ता. आर्धापुर, जि. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी फिर्यादी महिला आणि तिचे सहकारी यांना चार अनोळखी इसमांनी आमच्या सोबत कामासाठी चला असे सांगून चार चाकी गाडीतून जुन्या कात्रज बोगदयाचे पलीकडे नेले. त्यानंतर प्रवासी गाडीतुन उतरुन डोंगराकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर नेऊन फिर्यादी महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिणे व मोबाईल हॅन्डसेट आणि रोख रुपये असा एकूण ७६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला.
या प्रकरणी पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, कलम ३९२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करून चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरी केलेला दोन सोन्याचे मंगळसुत्र, दोन जोड कानातील फुले, असा एकूण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.