संग्रहित छायाचित्र
पुणे: वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या तरुणाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ओम महादेव यादव (वय १९, मूळ रा. कोरडेवाडी, ता. केज, जि. बीड, सध्या रा. बकोरी फाटा, जेएसपीएम कॉलेज जवळ, वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबरला स्वामी नारायण मंदिर परिसरातून एका वृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्यातून आरोपीने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरी केले होते. या प्रकरणी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम तसेच पोलीस अंमलदार या गुन्ह्यातील आरोपीचा बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषण करून शोध घेत होते. त्यावेळी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, पोलीस अंमलदार अमोल पाटील यांना आरोपी ओम यादव हा वाघोली येथील जेएसपीएम कॉलेजसमोरील काही अंतरावरील एका इमारतीजवळ थांबलेला असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार योग्य ती खात्री करून यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे विचारपूस केली. यादव याच्याकडे अधिक तपास केला असता चोरी केलेले १ लाख रुपये किमतीचे २१.४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र त्याने आपल्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याच्याकडून ते मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून आरोपीला सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५) अंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी यादव याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पूढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.