मध्यरात्री टोळक्यांचा पोलीसांवर गोळीबार
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस अक्शन मोडमध्ये आले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांकडून मेगा कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. मध्यरात्री गल्ली-बोळात धाड टाकून अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, रात्री १ वाजण्याच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ०३ चे पोलीस अधिकारी आणि गुन्हेगार यांच्यात झटापट झाली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलीसांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले की, गुन्हे शाखेकडील युनिट ०३ चे अधिकारी व कर्मचारी वारजेतील म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत असताना रोझरी स्कूलच्या जवळ आठ ते दहा इसमांच्या संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्या. यावेळी पोलीस गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी जात होते. मात्र, यातील एका संशयित आरोपीने पोलीसांच्या दिशेने अग्नीशस्त्र रोखले. या दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपींनी फेकलेल्या शस्त्रामुळे एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या दरम्यान पाच जणांना पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे.
पोलीस कर्मचाऱ्याला हत्यात लागताच इतर चार ते पाच आरोपींवर पोलिसांकडून फायरिंग करण्यात आली आहे. पोलीसांचा गोळीबार पाहताच आरोपी अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींची शोध चालू आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. दरम्या, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, दोन लोखंडी कोयते, कटावणी स्क्रू ड्रायव्हर, हातोडा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले आहे.