चौथ्या संशयिताला ५ ऑगस्टपर्यंत कोठडी
पुणे एटीएसने कोथरूडला पकडलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी रत्नागिरीतून एका संशयितला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. २८ जुलै रोजी चौथ्या आरोपीला अटक केली असून त्याला ५ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी यांना २३ जुलै रोजी कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीवरून अबदुल कादीर दस्तगीर याला या दोघांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता सिमाब नसुरुधिन काझी या चौथ्या संशयिताला अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला ५ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
पुणे दहशतवादी प्रकरणात रत्नागिरीमधून अटक करण्यात आलेला सिमाब नसुरुधिन काझी हा आयटी इंजिनियर आहे. तो यापूर्वी पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या घराचे भाडे भरत होता. सिमाब हा त्याला मिळणाऱ्या पगारातील रक्कम म्हणून देत होता. तो पुण्यातील कोंढव्यात राहायला होता. मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील पंढेरी गावचा आहे. सिमाब मुळ गावी गेला असताना त्याला पकडून आणण्यात आले आहे. सिमाब हा पठाण याला पैसे पाठवत होता. दोन ते तीन वेळा त्याने पैसे पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.
‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबंधित मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान या दोन दहशतवाद्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळले आहे. खान, साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हे दोघे १५ महिन्यापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य जप्त केले होते. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली होता. आता रत्नागिरीतून चौथ्या आरोपीला अटक करण्यात आले आहे.