Pune : कोरेगाव पार्कमध्ये बोकाळला वेश्याव्यवसाय; स्पा-मसाज सेंटरच्या नावाखाली चालतो गोरखधंदा

कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात एकीकडे ‘नाईट लाईफ’मुळे (Night life) नागरिक त्रस्त झालेले असतानाच दुसरीकडे बेकायदा वेश्याव्यवसाय (Illegal prostitution) बोकाळला आहे.

Prostitution in Koregaon Park

कोरेगाव पार्कमध्ये बोकाळला वेश्याव्यवसाय; स्पा-मसाज सेंटरच्या नावाखाली चालतो गोरखधंदा

सामाजिक सुरक्षा शाखेकडून चार परदेशी तरुणींसह सात जणींची सुटका

कोरेगाव पार्क (Koregaon Park) परिसरात एकीकडे ‘नाईट लाईफ’मुळे (Night life)  नागरिक त्रस्त झालेले असतानाच दुसरीकडे बेकायदा वेश्याव्यवसाय (Illegal prostitution)  बोकाळला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व बेकायदेशीर धंदे बंद ठेवण्याचे आदेश देऊनदेखील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र, स्पा-मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्यात ‘अमर’पदी विराजमान असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हे धंदे पोसले जात आहेत. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने मंगळवारी (दि. २) संध्याकाळी ‘एला स्पा’ याठिकाणी कारवाई करीत सात तरुणींची सुटका केली. यामध्ये थायलंडच्या चार तर तीन भारतीय तरुणींचा समावेश आहे. या कारवाईमुळे कोरेगाव पार्कमधील गोरखधंदा पुन्हा एकदा समोर आला आहे. (Prostitution in Koregaon Park)

शाहरुख अहमद चौधरी (वय २७, रा. जाधवनगर, मुंढवा) आणि सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय ३२, रा. सुखवानी रॉयल सोसायटी, विमाननगर) यांच्यावर भादंवि आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख हा ‘स्पा’मध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. तो मूळचा आसाम राज्यातील हुजाई जिल्ह्यातील आहे. सुरेन्द्र पाटील हा ‘स्पा’चा मालक आहे. गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्कमधील ज्वेल स्क्वेअर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ‘एला स्पा’ आहे. यामध्ये भारतीय आणि परदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर बनावट ग्राहक पाठविण्यात आला. ग्राहकाने याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.  

सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये थायलंडच्या चार तरुणींचा समावेश आहे. तर, मिझोरामच्या दोन तरुणी आणि छत्तीसगढच्या एका तरुणीसह एकूण सात जणींची सुटका करण्यात आली. थायलंडवरुन आलेल्या तरुणी ‘बिझनेस व्हिसा’वर भारतात आलेल्या आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत त्या भारतात आल्या. एजंटमार्फत त्या पुण्यात आल्या. एजंटनेच त्यांना शाहरुख चौधरी आणि सुरेन्द्र पाटील यांच्याकडे पाठवले होते. त्या एजंटचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी या कारवाईत ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये साडेचार हजारांची रोकड, तीन मोबाईल व अन्य साहित्याचा समावेश आहे.

कोरेगाव पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा ‘स्पा’ आणि ‘मसाज पार्लर’ बोकाळले आहेत. याठिकाणी अनेक विदेशी नावांनी हे ‘स्पा’ आणि ‘मसाज सेंटर’ चालवले जात आहेत. पोलीस ठाण्यात ‘अमर’पदी विराजमान असलेले कर्मचारी या गोरखधंद्याला पाठबळ देत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच कोरेगाव पार्कमध्ये असलेला एका ‘स्पा’च्या दारातच दत्तात्रय कुरळे (वय अंदाजे ५०, रा. सिंहगड रोड) या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला होता. कोरेगाव पार्कमधील लेन नंबर ७ मध्ये असलेल्या एका इमारतीमधील ‘स्पा’ मध्ये ते गेले होते. त्यानंतर, ते मृतावस्थेत आढळून आले होते. 

यापूर्वीदेखील अनेक मसाज पार्लर आणि थाई स्पाच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. आजवर डझनावारी मसाज पार्लर आणि स्पा सेंटरवर गुन्हे शाखेने कारवाई केलेली आहे. तरीदेखील स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा याठिकाणी हा प्रकार सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest