पुणे: सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू; शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात घडली दुर्घटना

पुणे : मेट्रो प्रवाशाचा सरकत्या जिन्यांवरून घसरून पडल्यामुळे जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी संध्याकाळी घडली. त्यांना मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

संग्रहित छायाचित्र

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजवरुन तपास सुरू

पुणे : मेट्रो प्रवाशाचा सरकत्या जिन्यांवरून घसरून पडल्यामुळे जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकात सोमवारी संध्याकाळी घडली. त्यांना मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही दुर्घटना नेमकी घडली कशी? याचा तपास सुरू करण्यात आला असून सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मनोज कुमार (वय ४०) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार हे मूळचे छत्तीसगढ येथील रहिवासी होते. ते कामानिमित्त पुण्यामध्ये आलेले होते. ते सोमवारी (१ जुलै) संध्याकाळे साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकामध्ये मेट्रोने उतरले. स्टेशनमधून बाहेर पडत असताना ते सरकत्या जिन्यावरुन जात होते. काही कळण्याच्या आतच ते अचानक जिन्यावरच पडले. मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांनी हा प्रकार पाहिला. या कर्मचाऱ्यांनी तातडीने सरकत्या जिन्याची यंत्रणा बंद केली. त्यांना मेट्रो स्थानकातील वैद्यकीय कक्षात हलवण्यात आले. मनोज कुमार गंभीर जखमी झालेले होते. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्यांचा  उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मनोज कुमार यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती कळवण्यात आली. त्यांचे नातेवाईक घटनेचे माहिती मिळताच तातडीने पुण्यात दाखल झाले. त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय आहे याबाबत पोलिसांना स्पष्टपणे सांगता येत नाही. दरम्यान, शवविच्छेदन करताना पोलिसांनी व्हीसेरा राखून ठेवला आहे. ते कोणत्या स्थानकावरून आले होते? जिन्यावरुन जात असताना ते नेमके कसे पडले? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर मेट्रो अधिकाऱ्यांनी सरकत्या जिन्याची तपासणी करून घेतली. दरम्यान, मनोज कुमार यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार असल्याचे पोलिसांना सांगितले असून पोलिसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest