पुणे: शस्त्रक्रियेसाठी डॉ. तावरे ओरबाडायचा मलिदा? परजिल्ह्यात दलालांचे उभे केले ‘नेटवर्क, पोलिसांच्या तपासात बाहेर आली माहिती

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. अजय तावरे याचे नवनवे कारनामे समोर येऊ लागले आहेत.

संग्रहित छायाचित्र

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी वैद्यकीय तपासणीदरम्यान त्याच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. अजय तावरे याचे नवनवे कारनामे समोर येऊ लागले आहेत. डॉ. तावरे (Dr. Ajay Taware) हा अडल्यानडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून शस्त्रक्रियेसाठी पैसे उकळत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विविध जिल्ह्यांमधून ससून रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्याने लाखो रुपये आतापर्यंत रिचवल्याचे देखील समोर आले आहे. विशेष म्हणजे त्याने परजिल्ह्यात दलालांचे ‘नेटवर्क’ उभे केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. 

एरवी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागातील अधिक रुग्ण असतात. आवश्यकतेप्रमाणे विविध जिल्ह्यांमधील रुग्ण देखील ससून रूग्णालयात पाठवले जातात. विशेषता: पश्चिम महाराष्ट्रामधून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. ससूनमध्ये एखादी नियोजीत शस्त्रक्रीया करण्यासाठी ३० ते ४५ दिवसांचा कालावधी रुग्णांना दिला जातो. मात्र, अनेकदा काही रुग्ण अत्यवस्थ असतात. नातेवाईक हवालदिल झालेले असतात. आपल्या माणसाला काही होऊ नये अशी त्यांची भावना असते. मात्र, त्यांना शस्त्रक्रियेसाठी लवकर वेळ मिळत नाही. परंतु, जर कोणी डॉ. तावरेला जाऊन भेटले तर अवघ्या दोनच दिवसांत शस्त्रक्रिया पार पाडल्या जायच्या. विशेषत: परजिल्ह्यामधून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून शस्त्रक्रिया लवकर करून देण्याच्या नावाखाली पैसे उकळले जात होते. पर जिल्ह्यातून ससून रुग्णालयात रुग्ण आणण्यासाठी आणि त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठीचे व्यवहार करून देण्यासाठी डॉ. तावरे याने काही जिल्ह्यात दलाल नेमण्यात आले होते. त्या दलालामार्फत रुग्ण आल्यानंतर त्याला ससूनमध्ये सुविधा प्राप्त होत होत्या, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलताना सांगितले. 

कल्याणीनगर येथे १९ मे रोजी झालेल्या भीषण पोर्शे अपघातात गुन्हा दाखल झालेल्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मुलाला वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात आणले असता डॉ. तावरे याने डॉ. श्रीहरी हाळनोर याला त्याचे रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितले. डॉ. तावरे याला इस्टेट एजंट असलेल्या अशपाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांनी रक्त बदलण्यास सांगितले. त्याकरिता तीन लाख रुपये देखील देण्यात आले. हा प्रकार गुन्हे शाखेने उघड करीत डॉ. तावरे, डॉ. हाळनोर, मकानदार, गायकवाड यांना अटक केली. यामध्ये विशाल अगरवालचा देखील सहभाग होता. ससूनचा शिपाई अतुल घटकांबळे याला बाल न्यायमंडळाच्या परिसरात तब्बल ४ लाख रूपये दिल्याचा प्रकार आता समोर आला आहे. त्यातील अडीच लाख रूपये डॉ. हाळनोर तर ५० हजार रूपये घटकांबळे याच्याकडून जप्त करण्यात आले होते. मात्र उर्वरीत एक लाख नेमके कोणाला मिळाले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ससूनच्या दोन्ही डॉक्टर्सच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र दिले आहे.  दरम्यान, तपासात डॉ. तावरेचा आणखी एक कारनामा समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काही रुग्णांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधला आहे. त्यांचे जबाब नोंदविण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या नातेवाईकांपैकी कोणी तक्रार केल्यास आणखी एक गुन्हा त्याच्यावर दाखल केला जाण्याची शक्यता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest