Pune Crime News : दुबईला जाण्यासाठी सारफावर गोळीबार, तिघांना अटक

घरी निघालेल्या सोनारावर पिस्तुलामधून बेछूट गोळीबार करीत त्याला गंभीर जखमी करून रोकड असलेली बॅग हिसकावून नेणाऱ्या तीन आरोपींना वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत.

दुबईला जाण्यासाठी सारफावर गोळीबार, तिघांना अटक

वानवडी पोलिसांनी केली दिल्लीच्या तिघा हल्लेखोरांना अटक

पुणे : घरी निघालेल्या सोनारावर पिस्तुलामधून बेछूट गोळीबार करीत त्याला गंभीर जखमी करून रोकड असलेली बॅग हिसकावून नेणाऱ्या तीन आरोपींना वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. ही घटना घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्त्यावर ८ नोव्हेंबर रोजी घडली होती. आरोपींनी लुटीचे पैसे मिळाल्यानंतर दुबईला कामासाठी पळून जाण्याचा 'प्लान' रचला होता. मुख्य आरोपी पुण्याच्या मिल्ट्री कँटीनमध्ये चालक म्हणून नोकरी करीत होता. त्यानेच या हल्ल्याचा पूर्ण कट रचला होता.

बिलाल अहमद असदअली त्यागी (वय ३४, रा. उत्तर पूर्व दिल्ली, मूळ रा. मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश), हनी जिथे वाल्मिकी (वय २६, रा. साउथ वेस्ट दिल्ली) आणि सागर राजकुमार (वय २६, रा. नॉर्थ वेस्ट, दिल्ली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या घटनेमध्ये प्रतीक मदनलाल ओसवाल हे जखमी झाले होते. त्यांच्या गालावर आणि पायावर अशा तीन गोळ्या लागल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मदनलाल ओसवाल यांनी फिर्याद दिली आहे.  प्रतीक ओसवाल आणि मदनलाल ओसवाल यांचे हडपसर येथील सय्यद नगर मध्ये नाकोडा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ८ नोव्हेंबर रोजी रात्री दुकान बंद करून हे दोघेही बॅगेत दोन तोळे सोन्याचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड घेऊन मुंढवा येथील राहत्या घरी जात होते.  बी टी कवडे रस्त्यावरील जयसिंग ससाने उद्यानाजवळ आले असता एका मोटरसायकल वरून आलेल्या तीन जणांनी त्यांना गाडी आडवी घालून थांबवले आणि त्यांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.

प्रतीक यांनी विरोध केला असता त्याच्या दोन्ही पायांवर आणि तोंडावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या ठिकाणी एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यातील तीन गोळ्या प्रतीक यांच्या अंगात घुसल्या होत्या. त्यांच्यावर इनामदार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वानवडी पोलिसांच्या तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी तपास करीत होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट पाच कडून देखील समांतर तपास सुरू होता. दरम्यान वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना आरोपी दिल्ली येथे पळून गेल्याची खाबऱ्यामार्फत माहिती मिळाली. वानवडी पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाची मदत घेऊन बिलाल, वाल्मिकी आणि सागर कुमार या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना अटक करीत न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली.

दरम्यान, आरोपी बिलाल हा पुण्यामध्ये पूर्वी राहण्यास होता. तो आर्मी क्वार्टर्समध्ये चार चाकी चालक म्हणून काम करीत होता. याच काळात त्याची सरफराज हनीफ शेख (वय २३, रा. रामटेकडी) याच्याशी ओळख झालेली होती. बिलाल याचे हडपसरच्या सय्यद नगर परिसरात जाणे येणे होते. त्या ठिकाणी त्याने मदनलाल आणि प्रतीक यांच्या नाकोडा ज्वेलरी शॉपची माहिती घेतली आणि त्यांच्यावर पाळत ठेवली होती. ते दुकानामध्ये किती वाजता येतात? किती वाजता जातात? त्यांचा रोजचा व्यवसाय किती आहे या सर्वांची माहिती त्यांनी घेण्यास सुरुवात केली होती. ओसवाल यांना लुटणे सोपे असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने ओसवाल यांना लुटण्याचा कट रचला. त्यानंतर तो दिल्ली येथे गेला आणि त्याने वाल्मिकी आणि सागर कुमार या दोघांशी या विषयावर चर्चा केली. दिल्ली येथूनच त्याने तीन पिस्तुले मिळवली. हे तिघेही पुण्यामध्ये रेल्वेने आले. दिल्ली ते पुणे या रेल्वे तपासा प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेत ही पिस्तुले होती. मात्र, ही पिस्तुले कुठेही तपासणीत आढळून आली नाहीत हे विशेष आहे. घटनेच्या दिवशी घरी निघालेल्या ओसवाल पिता पुत्रांवर या तिघांनी हल्ला केला. त्यांना घाबरवण्यासाठी आधी दोन गोळ्या हवेमध्ये झाडण्यात आल्या. त्यानंतर तीन गोळ्या प्रतीकवर झाडण्यात आल्या. एक गोळी प्रतीकच्या गालाला चाटून गेली. तर अन्य दोन गोळ्या त्याच्या पायामध्ये लागलेल्या होत्या. यासंदर्भात आरोपींकडे अधिक तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त शाहूराज साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय विनय पाटणकर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस अंमलदार अजय केसरकर, अमजद पठाण, संतोष नाईक, अतुल गायकवाड, हरिदास कदम, महेश गाढवे, संदीप साळवे, विष्णू सुतार, निळकंठ राठोड, यतीन भोसले, राहुल माने, विठ्ठल चोरमले, अमोल गायकवाड आणि सोनम भगत यांच्या पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest