पुणे: भ्रष्टाचारातून कमावली काळी माया; भूमी अभिलेखच्या माजी उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा

पुणे : उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिकची काळी ‘माया’ जमवल्याप्रकरणी नागपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या तत्कालीन उपसंचालकासह त्याच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिकची काळी ‘माया’ जमवल्याप्रकरणी नागपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या तत्कालीन उपसंचालकासह त्याच्या पत्नीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एसीबीकडून येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कल, १३ (१) (इ), १३ (२) सह भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, आयपीसी १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादाभाऊ सोनू तळपे (वय ६२) असे गुन्हा दाखल झालेल्या उपसंचालकाचे नाव आहे. त्याच्यासह पत्नी कल्पना दादाभाऊ तळपे (वय ५८ दोघे रा. हरमस हेरिटेज, येरवडा) यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे. तत्कालीन उप संचालक तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत एसीबी कार्यालयाकडे तक्रार आलेली होते. या तक्रारीची उघड चौकशी एसीबीकडून केली जात होती. त्यांच्या एकूण सर्व मालमत्ता आणि उत्पन्न, खर्च यांची माहिती एसीबीने घेतली. त्याचा तपास करण्यात आला. संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशी स्त्रोताद्वारे संपादित केल्या आहेत किवा कसे? याबाबत माहिती देण्यासाठी त्यांना वेळोवेळी संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी पुष्टीदायक पुरावे सादर केले नाहीत.

भूमी अभिलेख विभागात कार्यरत असताना त्यांनी कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे २८ लाख ५२ हजार ५४१रुपयांची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने संपादीत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हे प्रमाण ज्ञात उत्पन्ना पेक्षा १८.७४ टक्के आहे. बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी तळपे यांना त्याची पत्नी कल्पना यांनी सहाय्य केल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, गुन्हा करण्यास प्रोत्साहित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest