संग्रहित छायाचित्र
पुणे : पुणेकर आणि वडापाव यांचं चविष्ट नातं आहे. मराठी लोकांच्या अस्मितेच्या विषयांमध्ये ‘वडापाव’ची गणना होऊ लागली आहे. वडापाव प्रत्येकाला गरमागरमच हवा असतो. त्यातील मजा काही वेगळीच असते. खाण्याचे शौकीन त्यांच्या मनाप्रमाणे खाद्यपदार्थ मिळाले नाहीत तर आकांततांडव करतात. अशीच एक घटना बालेवाडी येथे घडली. एका वडापाव विक्रेत्याने दिलेला गार वडापाव पाहून ग्राहकाचा पारा चढला. थंड वडापाव पाहून चिडलेल्या या ग्राहकाने थेट विक्रेत्याला बडवून काढले. तसेच, त्याला काचेची बरणी फेकून मारली. या घटनेची चर्चा बालेवाडी परिसरात दिवसभर सुरू होती.
प्रकाशचंद्र शंकरलाल जोशी (वय ४५, रा. बालेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात अंकुश कोंडिबा ढेबे (वय २३) याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशचंद्र जोशी यांचे बालेवाडीमधील साई चौकात शिवकृपा स्नॅक्स सेंटर नावाचे खाद्यपदार्थ उपहारगृह आहे. दुपारी साधारण बाराच्या सुमारास ढेबे आणि त्याचे दोन मित्र उपहारगृहात आले. त्यांनी वडापाव खाण्यास मागितला.
हा वडापाव थंड होता. त्यामुळे आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसन भांडणात झाले. आरोपींनी दुकानातील चहाचा थर्मास जमिनीवर आपटून फोडला. ढेबे याने काऊंटरवरील काचेची भरणी जोशी यांना फेकून मारली. जोशी यांच्या डोक्याला आणि हाताला मार लागला. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरुन पसार झाले.