संग्रहित छायाचित्र
मालक देवदर्शनासाठी गेल्यानंतर नोकराने सोनाराच्या दुकानातील दागिने तसेच रोकडचा अपहार केला. यात एक कोटी ३७ लाख ८० हजार ९०० रुपये नेऊन विश्वासघात केला. पिंपळे गुरव येथील वर्षा ज्वेलर्स दुकानात ३ ते ८ नोव्हेंबर २०२४ या कालवधीत हा प्रकार घडला.
मतेश रणजितमल जोधावल (३५, रा. मंगळवार पेठ, पुणे) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ९) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. डुंगर राजू सिंग (२७, रा. कुंडा, जि. जैसलमेर, राजस्थान) याच्या विरोधात पोलिसांनी बीएनएस कायदा कलम ३१६ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मतेश जोधावत यांचे दाजी नितीन पारेख यांचे पिंपळे गुरव येथे वर्षा ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात डुंगर सिंग हा कामाला होता. नितीन पारेख हे देवदर्शनासाठी गेले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या दुकानातील सर्व सोन्या चांदीचे दागिने व दुकानाचे सर्व आर्थक व्यवहार दुकानातील नोकर डुंगर सिंग याच्याकडे विश्वासाने सोपविले. दरम्यान, डुंगर सिंग याने दुकानातील एकूण १८६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व तीन लाख ५० हजार रोख रक्कम असा एकूण एक कोटी ३७ लाख ८० हजार ९०० रुपयांचा ऐवज अप्रामाणिकपणे स्वत: नेऊन अपहार केला. नितीन पारेख यांचा अन्यायाने विश्वासघात केला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते तपास करीत आहेत.