संग्रहित छायाचित्र
पती कामानिमित्त परगावी गेल्यानंतर घरामध्ये एकट्या असलेल्या विवाहितेचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर तिचा मृतदेह पलंगाच्या कप्प्यात दडवून ठेवत खूनी पसार झाला. ही घटना हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात घडली. या खुनामागील कारण अद्याप समोर आलेले नसून फुरसुंगी पोलिसांकडून कसून तपास सुरू करण्यात आला आहे.
स्वप्नाली उमेश पवार (वय २४, रा. अष्टविनायक कॉलनीजवळ, हुंडेकरी वस्ती, फुरसुंगी ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. स्वप्नाली यांचे पती उमेश चारचाकी गाडीवर चालक म्हणून काम करतात. उमेश शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त प्रवासी घेऊन बीडला गेले होते. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ते काम संपवून घरी परत आले. त्यावेळी त्यांना घराला बाहेरून कडी असल्याचे दिसले. त्यांनी कडी उघडून घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना पत्नी स्वप्नाली घरात आढळून आली नाही. त्यांनी आसपासच्या परिसरात शोध घेतला. मात्र, त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. घरातील दागिने, रोकड, पत्नीचा मोबाइल याची त्यांनी शोधाशोध सुरू केली. दागिने, रोकड पलंगात ठेवली आहे का?, हे पाहण्यासाठी त्यांनी पलंग उघडला. तेव्हा पलंगातील कप्यात पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.या खुनामागचे कारण समजू शकलेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे निरीक्षक मोढवे यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.