संग्रहित छायाचित्र
मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे रविवारी (दि. १०) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून तळेगाव दाभाडे पोलीसांनी ३६ लाख ९० हजार ५०० हजारांची रोकड जप्त केल्याचा प्रकार ताजा असतानाच देहुरोड पोलीसांनी देहुगावात मंगळवारी (दि. १२) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या देहु शहराध्यक्षाच्या कारमधून सव्वातीन लाखाची रोकड जप्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष विवेक वसंत काळोखे (वय ४४, रा. काळोखे मळा, देहूगाव) यांच्यासह सागर निवृत्ती भसे (वय ३९, रा. भीमाशंकर सोसायटी, देहूगाव) यांच्याकडून रोकड जप्त केली आहे. देहूरोड पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी याबाबत माहिती दिली.
देहुगावातील चव्हाणनगर येथे दोन जण फॉर्च्यूनर कारमध्ये पैसे घेऊन मतदारांना वाटण्यासाठी आले आहेत, अशी माहिती देहुरोड पोलीसांना मिळाली. त्यावरून पोलीसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारमध्ये सागर भसे आणि विवेक काळोखे हे दोघे जण होते. पोलीसानी कारची तपासणी केली असता ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीट खाली चॉकलेटी रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये ३ लाख २० हजार रूपयांची रोकड आढळून आली. या रकमेबाबत काळोखे व बसे यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तरे न दिल्याने तसेच त्यांनी ही रक्कम कोठून आणली याबाबत काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने रोकड दोन पंचांसमक्ष जप्त करून सील करण्यात आली. पुढील कारवाईकरिता ही रोकड निवडणूक विभागाच्या भरारी पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे.