संग्रहित छायाचित्र
आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी तरुणीची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वानवडीतीली परमार पार्क परिसरातील एका तरुणीने दिलेल्या फिर्यादी नुसार वानवडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील देशातील आयुर्विमा पॉलिसीच्या कंपन्यांचे प्रतिनिधा फोनवरुन ऑनलाईन पॉलिसी काढून देण्याची माहिती देत असतात. संबंधित प्रतिनिधीने सांगितलेली ऑफर ऐकून अनेक वेळा पॉलिसी काढली जाते. याचाच फायदा सायबर चोरट्यांकडून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. फिर्यादी तरुणीला एका आयुर्विमा कंपनीतील प्रतिनिधी असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. सायबर चोरट्यांनी पाच महिन्यांपूर्वी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. एका खासगी कंपनीच्या आयुर्विमा पॉलिसीच्या वार्षिक भरण्याबाबत विचारणा केली. चोरट्यांनी बतावणी करुन तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. पॉलिसीतील काही रक्कम परताव्यापोटी देण्यात येणार असल्याचे आमिष दाखवले. त्या आमिषाला बळी पडून तरुणीला चोरट्यांनी बँक खात्याची माहिती दिली. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात तरुणीने वेळोवेळी १३ लाख ३२ हजार रुपये जमा केली. त्यानंतर कोणताही परतावा न देता चोरट्यांनी तरुणीलाच आणखी रक्कम पााठवण्यास सांगितले. परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.
तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. आयुर्विमा पॉलिसी बंद पडली आहे. पॉलिसी सुरू करण्यासाठी तातडीने काही रक्कम भरावी लागेल, अशी बतावणी करुन सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सायबर चोरट्यांनी अशा पद्धतीने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली आहे. अशा कोणत्याही फसव्या फोन कॉल्सला नागरिकांनी बळ पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जात आहे.