संग्रहित छायाचित्र
ट्रॅव्हल्स बस व्यवसायातून दरमहा तीन लाख रुपये देतो, असे सांगून नवीन दोन ट्रॅव्हल्स बससाठी ३८ लाख रुपये घेतले. मात्र, कोणत्याही गाड्या नावावर न करता पितापुत्राने महिलेची फसवणूक केली. तसेच गैरवर्तनकरून तिचा विनयभंग केला. निगडी, आकुर्डी आणि भोसरी येथे १९ नोव्हेंबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२४ या कालवधीत हा प्रकार घडला.
संजय नारायण पवार (४५), आणि सागर संजय पवार (२२, दोघेही रा. राजेशिवाजीनगर, चिखली प्राधिकरण) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने शनिवारी (दि. ९) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन ट्रॅव्हल्सचे मालक संजय पवार यांनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून दोन ट्रॅव्हल बसच्या व्यवसायामध्ये महिन्याला तीन लाख रुपये देतो, असे सांगितले. दोन ट्रव्हल्स करीता १९ नोव्हेंबर २०२३ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान निगडी व आकुर्डी येथे २३ लाख ४० हजार रुपये ऑनलाइन व १४ लाख ६० हजार रुपये रोख, असे एकूण ३८ लाख रुपये घेतले. त्याबदल्यात नवीन ट्रॅव्हल बसचे फोटो प्रत्यक्षात जुन्या ट्रॅव्हल बस दाखविल्या. त्यामुळे फिर्यादी महिलेने वेळोवेळी गाड्यांबाबत विचारणा केली. संशयितांने फिर्यादीचे पैसे परत न करता कोणत्याही गाड्या फिर्यादीच्या नावावर न करता आर्थिक फसवणूक केली.
तसेच १६ मार्च २०२४ रोजी फिर्यादी महिला पैसे मागण्यासाठी संजय पवार यांच्या भोसरी येथील स्पाईन रोड येथील राॅयल कोच गॅरेज येथे गेल्या. त्यावेळी तेथे पवन ट्रॅव्हल्स व साई कृपा ट्रॅव्हल्सचे मालक संजय पवार आणि सागर पवार यांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून अपशब्द वापरले. तसेच फिर्यादी महिलेच्या अंगावर तीन ते चार जणांना सोडून इज्जत लुटण्यास लावतो, असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सागर पवार याने गैरवर्तन करून फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. परत पैसे मागायला येऊ नकोस, नाहीतर आम्ही जे बोललो आहे ते करून दाखवू, असे बाेलून संशयित जोरजोरात हसले. पोलिस निरीक्षक (गुन्हे) बिलाल शेख तपास करीत आहेत.