संग्रहित छायाचित्र
लोणी काळभोर भागातील म्हातोबाची आळंदी परिसरात बुलेटचालक तरूणाचा पाठलाग करुन चोरट्यांनी त्याला लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विकास शेंडगे (वय ३२, रा. म्हातोबाची आळंदी, ता.हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलेटचालक विकास ८ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास म्हातोबाची आळंदी परिसरातून निघाले होते. त्यांच्या मागावर असलेल्या तीन चोरट्यांनी रेल्वे पुलाजवळ बुलेटस्वार विकास यांना अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवला. त्यांच्या हातातील चांदीचे कडे आणि खिशातील १७०० रुपये असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तपास करत आहेत.
पादचारी, दुचाकीचालकांना धमकावून त्यांच्याकडील ऐवज, मोबाइल चोरट्यांनी लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. दुसऱ्या घटनेत वित्तीय संस्थेतील वसुली पथकातील कर्मचारी असल्याची बतावणी करुन टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करुन त्याची दुचाकी चोरून नेल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील हॅरिस पुलाजवळ घडली. याबाबत दीपक नरेंद्र काळे (वय २४, रा. शास्त्री चौक, भोसरी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार काळे मुंबई-पुणे रस्त्याने निघाले होते. बोपोडीतील हॅरिस पुलाजवळ त्यांना दोन चोरट्यांनी अडवले. चोरट्यांनी त्यांना मारहाण करुन दुचाकी चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ तपास करत आहेत.