कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची निर्दोष मुक्तता
कुख्यात गुंड, गँगस्टर आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता शरद मोहोळ यांच्यासह इतर सात जणांची पुणे सत्र न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. डी. निंबाळकर यांनी हा निकाल दिला. मोहोळ याच्यासह सहकाऱ्यांवर पौड पोलीस स्टेशन येथे अपहरण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल होते.
२०११ मध्ये पौड येथील एका व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या संदर्भात पौड पोलीस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी या प्रकरणाचा अंतिम निकाल देण्यात आला. अहवालानुसार, या प्रकरणात एकही साक्षीदार साक्ष देण्यासाठी पुढे आला नाही. याशिवाय, मोहोळ आणि त्याच्या साथीदारासंदर्भात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे आरोपींची सर्व खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान, शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहेत. विरोधी टोळीतील पिंटू मारणे याच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला आणि दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केले. त्यामुळे त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या कालावधीत येरवडा कारागृहात त्याने आणि विवेक भालेराव या दोघांनी मिळून दशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कतील सिद्दीकीचा खून केला.