पुणे: नागरिकांना मारहाण करणारा तोतया पोलीस गजाआड

एकीकडे भारताने ‘टी-२०’ विश्वचषक जिंकला... दुसरीकडे पुण्यात रात्री जल्लोष सुरू झाला... डेक्कन परिसरात जल्लोष सुरू असतानाच विश्रामबाग पोलिसांना पिंपरी-चिंचवडच्या पोलिसाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली... त्याची बंदूक तुटल्याचे पोलिसांना समजले...

Pune Crime News, Tilak Chowk Pune, Vishrambag Police, Sumant Parte, Pune Police

संग्रहित छायाचित्र

‘एयर गन’ जप्त, विविध शासकीय बनावट ओळखपत्रे घेतली ताब्यात, महिन्यापूर्वी ट्रॅव्हल कंपनीत होता शिपाई

एकीकडे भारताने ‘टी-२०’ विश्वचषक जिंकला... दुसरीकडे पुण्यात रात्री जल्लोष सुरू झाला... डेक्कन परिसरात जल्लोष सुरू असतानाच विश्रामबाग पोलिसांना पिंपरी-चिंचवडच्या पोलिसाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली... त्याची बंदूक तुटल्याचे पोलिसांना समजले... थेट पोलिसाला मारहाण झाल्याचे समजताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले... जखमी तरुणाकडे चौकशी केल्यावर तो तोतया पोलीस असल्याचे समोर आले. त्यानेच मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना मारहाण केल्याचे उघड झाले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. हा प्रकार रविवार, ३० जून रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लोकमान्य टिळक चौकात घडला.

 सुमंत किशोर पार्टे (वय २२, रा. शोभा टॉवर, पूना हॉस्पिटलजवळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भादवि ४२०, १७०, महाराष्ट्र दारूबंद कायदा कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक राहुल राजकुमार सोनार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून अमरावती पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) बनावट ओळखपत्र, युनिव्हर्सल पास, महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ओळखपत्र आणि पोलिसांचा गणवेश जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमंत पार्टे हा मूळचा रायगड जिल्ह्यातील महाडचा राहणारा आहे. तो पुण्यात एका खासगी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये शिपाई म्हणून काम करीत होता. एक महिन्यापूर्वी त्याने नोकरी सोडली. या महिन्यात त्याने लोकांना पोलीस म्हणून धमकावण्यास आणि पैसे उकळण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.

 ‘टी-२०’ विश्वचषकाचा अंतिम सामना शनिवारी भारत व दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार होता. शनिवारी मध्यरात्री भारताने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. पुण्यातही ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त केला जात होता. तसेच, शहरातील वेगवेगळ्या भागात जल्लोष सुरू होता. डेक्कन, लष्कर, कोरेगाव पार्क तसेच उपनगरात नागरिक आणि तरुण रस्त्यावर येऊन आनंद व्यक्त करीत होते. अलका चित्रपटगृहाजवळ असलेल्या टिळक चौकातही मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुण आनंद व्यक्त करीत होते. त्यावेळी अंगात खाकी रंगाची पॅन्ट घातलेला एक तरुण नागरिकांना हटकत होता. तसेच, त्यांना पोलिसांच्या कार्बाईन बंदुकीप्रमाणे दिसणाऱ्या वस्तूने मारहाण करीत होता. काही तरुणांना त्याने मारहाणही केली. दरम्यान, नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला.

पोलीस नियंत्रण कक्षाला पिंपरी-चिंचवड पोलीस दलात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती काही जणांनी कळवली. नियंत्रण कक्षाकडून ही माहिती विश्रामबाग पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे जाऊन चौकशी केली असता पार्टे याला मारहाण झाल्याचे समजले. त्याला घेऊन विश्रामबाग पोलिसांचे पथक पोलीस ठाण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला किरकोळ मारहाण झाल्याचे समजले. तो दारूच्या नशेत होता. पोलिसांना त्याने तो पिंपरी-चिंचवड पोलीस दलात नेमणुकीस असून देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगितले. पोलिसांना त्याच्या माहितीमध्ये विसंगती आढळली. दरम्यान, देहूरोड पोलिसांकडे याबाबत चौकशी केली असता अशी कोणतीही व्यक्ती पोलीस दलात नसल्याचे स्पष्ट झाले.

त्याचा बनाव उघडा पडल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याची वैद्यकीय तपासणी केली. तसेच, त्याला अटक करण्यात आली. आरोपी पार्टेने पोलीस असल्याची बतावणी करून आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, त्याच्या झडतीमध्ये त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांच्या अमरावती पोलिसांचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश, युनिव्हर्सल पास, महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या पायात पोलिसांसारखेच बूट होते. त्याने पोलीस अथवा शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करीत कोणाकोणाला लुबडले आहे याची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक भुजबळ यांनी सांगितले.

आरोपी सुमंत पार्टे हा बंदुकीच्या साहाय्याने नागरिकांना मारहाण करीत असल्याचा तसेच धमकावत असल्याचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हीडीओनंतर त्याच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून पोलिसांनी बंदूक जप्त केली असून ही ‘एयर गन’ असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतातील राखणीसाठी ही गन त्याने घेतलेली होती.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest