बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांचा वेश्याव्यवसाय, १९ जणांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार पेठेत अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १० बांगलादेशी महिल आणि ९ पुरूष अशा एकूण १९ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये १० बांगलादेशी महिला वेश्याव्यवसाय करीत होत्या. तर ०९ पुरुष हे वेगवेगळे व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी पुणे पोलीसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला बुधवारपेठतील वेश्या गल्लीतील कुंटनखान्यात बांगलादेशातुन विनापरवाना महिला आणि पुरूष वास्तव्य करीत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली होती. वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांकडे कोणतेही वैध कागदपत्र नाहीत. तसेच भारत बांगलादेश सिमेवरील मुलकी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय बांगलादेशातून १० मुली आणि ९ पुरुष यांनी भारतात अनधिकृत प्रवेश केल्याचे समजले.
त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले नागरिक बुधवार पेठ परिसरात गेल्या ३ महिन्यांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत होते. गुरूवारी रात्री छापा टाकून पोलीसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम १९५० चे कलम ३ सह ६, परकीय नागरीक आदेश १९४८ चा नियम ३ (१) सह परकीय नागरीक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील कारवाईसाठी आरोपींना फरासखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.