आोरपी अनुप प्रकाश वाणी
"मला चक्कर येत आहे, मला माझ्याच स्कूटीवर पुढेपर्यंत सोडू शकता का?" अशी मदत मागायचा. रात्रीच्या वेळी तरुणींनी मदत दिली की पाठीमागे बसून अश्लील चाळे करून छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक अनुभवानंतर तरुणीने हेल्पलाईन नंबर केलेल्या एका तक्रारीनंतर चतुशृंगी पोलीसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
अनुप प्रकाश वाणी (वय ४४, रा. शनिवार पेठ पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर कलम ३५४ भादवीसह कलम ८, १२ बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने केलेल्या आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मी आणि माझी मैत्रिण रात्रीच्या १० वाजता पुण्यातील सेनापती बापट रोडवरील इमारतीच्या बाजूने आमच्या घरी म्हणजेच गोखलेनगरमध्ये येत होतो.
यावेळी ५५ वर्षीय काका स्कूटी वरून जात होते आणि थांबून त्यांनी आम्हाला "मला चक्कर येत आहे मला मझ्याच स्कूटी वर पुढे पर्यंत सोडू शकता का?" अशी मदत मागितली. मी सुद्धा माणुसकीच्या नात्याने त्यांना मदत करण्यासाठी त्यांना घेऊन गेले. पण गाडीवर बसताच युनिव्हर्सिटीच्या रस्त्याने जात असताना त्यांनी मला खूप चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायला सुरुवात केली. तरी मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितले की मला हात लावू नका. पण त्यांचा चुकीचा स्पर्श वाढत होता. आणि मी गाडी थांबवून काही मुलांना मदत मागितली आणि त्या काकांना आहे तिथे सोडले.
दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर तरुणींनी पोलीसांच्या हेल्पलाईन नंबरवर तक्रार केली. पोलीसांकडे कोणताही पुरावा नव्हता. अशावेळी पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला. संबंधित रस्त्यावरील सीसीटीव्ही आरोपी आणि त्याचा गाडीनंबर कैद झाला होता. याच्याच आधारे पोलीसांनी आरोपी अनुप वाणीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीसांनी कसून चौकशी केली. यात आतापर्यंत २५ ते ३० तरुणींची छेडछाड केल्याचे उजेडात आले. याशिवाय मुलींकडून लिफ्ट घ्यायच्या बहान्याने अशा मुलींचे विनयभंग करण्याच्या अनेक घटना शिवाजीनगर, डेक्कन, अलंकार, चतुशृंगी परिसरात केले असल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणाचा अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.