पोलीसांनी नष्ट केले ४ कोटी ७५ लाखाचे अंमली पदार्थ
वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये आरोपींकडून जप्त करण्यात आलेले ४ कोटी ७५ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलीसांनी नष्ट केले आहेत. पुण्यातील एकूण २१ पोलीस ठाण्यातील दाखल झालेल्या ८० गुन्हयामध्ये हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. हा मुद्देमाल रांजणगाव येथील एल कंपनीच्या भट्टीमध्ये नष्ट करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एकूण २१ पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ कायदयानुसार तब्बल ८० गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांमध्ये गांजा, एम.डी, कोकेन, हेरॉईन, पॉपीस्ट्रॉ, चरस अशा अंमली पदार्थांचा साठा आरोपींकडून जप्त करण्यात आला होता.
जप्त करण्यात आलेल्या साठा पोलीस आयुक्तालयातील मुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत चाचणी कऱण्यात आली. त्यानंतर रांजणगाव येथील एल कंपनीच्या भट्टीमध्ये नष्ट करण्यात आला आहे. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ६७ लाख ७८ हजार ०२० रुपये किंमतीचा ३३८ किलो ९०१ ग्रॅम २९१ मिलीग्रॅम गांजा, १ कोटी ६७ लाख १७ हजार २१५ रुपये किमतीचा ०१ किलो ११४ ग्रॅम ४८१ मिलीग्रॅम एम.डी, २ कोटी १३ लाख ९४ हजार ४८५ रुपये किमतीचा ०१ किलो ४२६ ग्रॅम २९९ मिलीग्रॅम कोकेन, १९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा ०१ किलो ९६६ ग्रॅम चरस, २ लाख ८७ हजार ५३० रुपये किमतीचा २८ किलो ७५३ ग्रॅम पॉपीस्टॉ आणि ४ लाख ०९ हजार ८७२ रुपये किमतीचा १३६ ग्रॅम ६२४ मिलीग्रॅम हेराईन असा एकूण ४ कोटी ७५ लाख ५३ हजार रुपयांचा अंमली पदार्थ समाविष्ठ आहे.