Pune Crime News : पोलीस बंदोबस्तात 'व्यस्त', चोरटे हात सफाईत 'मस्त'

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने बाहेर आणि परगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये चोरट्यांनी हात साफ केला. दोन दिवसांमध्ये पाच सदनिका फोडून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 30 Sep 2023
  • 02:57 pm
Pune Crime News

गणेश विसर्जनाच्या निमित्ताने बाहेर आणि परगावी गेलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये चोरट्यांनी हात साफ केला. दोन दिवसांमध्ये पाच सदनिका फोडून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटना खडकी, लोणी काळभोर, कोंढवा, वानवडी परिसरामध्ये घडल्या. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याचा फायदा उचलत चोरट्यानी लाखोंचा ऐवज लंपास केला.

खडकी पोलीस ठाण्यामध्ये मनीषा बोरकर (वय ३६, रा. रेंजहिल्स खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. बोरकर या त्यांच्या कुटुंबासह राहत्या काॅर्टरला कुलूप लावून बाहेर गेलेल्या होत्या. साधारणपणे सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीचच्या दरम्यान आलेल्या चोरट्याने त्यांच्या कॉर्टरच्या मागील स्टोरेज रूमचा दरवाजा उघडला. कडी तोडून तो बेडरूममध्ये घुसला. लोखंडी कपाटात ठेवलेले तीन लाख एक हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि कारच्या इन्शुरन्सची कॉपी, आरसी बुक लंपास केले.

तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये विठ्ठल दत्तात्रय चौधरी (वय ३४, सोरतापवाडी, नायगाव) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सूरज प्रभाकर साळुंखे (वय २७) आणि कार्तिक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सूरज साळुंखे याला अटक करण्यात आली आहे. सूरज साळुंखे आणि कार्तिक पाटील या दोघांनी संगनमत करून विठ्ठल चौधरी यांच्या बंद  गोडाऊनमधून एक लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या गोडाऊनची जाळी बाजूला सारून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला  गोडाऊनमधील लोखंडी टायर डिश, लोखंडी बॉयलर सेट, एचपी मोटर लोखंडी, चेन पुली  इत्यादी साहित्य लंपास केले. पोलिसांनी एक लाख ४७ हजार रुपयांच्या चोरी प्रकरणी साळुंखे याला अटक केली आहे.

तर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये पिंटू येगू पवार (रा. विघ्नहर्ता सोसायटी, पवार मळा, वडकी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे फिरो रोबोटिक्स या कंपनीमध्ये काम करतात. या कंपनीचे लोखंडी ग्रील कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. दोन लाख ८० हजार रुपयांचे वेल्डिंग मशीन, एस एस पाईप मटेरियल, डीव्हीआर, सीसीटीव्ही, हॅन्ड ड्रिलिंग मशीन इत्यादी साहित्य चोरून नेले.

दामोदर भीमराव गायकवाड (वय ५०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा बुद्रुक) यांच्या घरातील अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून एक लाख दोन हजार ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, ३० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर वानवडी पोलीस ठाण्यात रमेश जनार्दन आगवणे (वय ५०, रा. रेल्वे सोसायटी, लुल्लानगर) यांनी फिर्याद दिली आहे. आगवणे यांच्या स्टोररूमच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी एक लाख ५२ हजार ८०० रुपयांचे इलेक्ट्रिकल साहित्य घरफोडी करून चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest