पुणेकरांनो, सणासुदीला खव्याचे पदार्थ बनवयात; २ टन भेसळयुक्त खव्याचा साठा जप्त
सणासुदीचे दिवस असल्याने अनेक ठिकाणी मिठाई, खवा, बर्फी याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर हे गोड पदार्थ खरेदी करताना पाहायला मिळतात. मात्र या पदार्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट हद्दीत असलेल्या उरवडे गावाजवळ एका दुकानात भेसळयुक्त खवा आणि बर्फी बनवणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकला आहे. कृष्णा फूड्स या ठिकाणी ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १० लाख ७३ हजार ६५० रुपयांचा भेसळयुक्त खव्याचा साठा जप्त करण्यात आला.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट गावच्या हद्दीत असणाऱ्या उरवडे रस्त्यावरील कोकाकोला कंपनीजवळ असणाऱ्या कृष्णा फूड्स येथे मोठ्या प्रमाणावर खवा आणि बर्फी बनवली जाते. मात्र या ठिकाणी बनत असलेली बर्फी ही भेसळयुक्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पौड पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकला. यात पोलिसांनी भेसळयुक्त बर्फी, स्कीम मिल्क पावडर, वनस्पती आणि पामतेल असा एकूण १० लाख ७३ हजार ६५० रुपयांचा साठा जप्त केला. तसेच सुमारे दोन टन तयार बर्फी जप्त केली आहे.
सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती 'बेस्ट बिफोर' दिनांक नमूद करावा व मिठाई बनवण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खव्याचा ( गुजरात बर्फी) वापर करू नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खव्याचा ( गुजरात बर्फी) वापर करून मिठाई बनवित असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.
नियम आणि अटींचे पालन केले नसल्याचे तपासणीत आढळून आल्याने हा व्यवसाय बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. हा भेसळयुक्त खवा पिरंगुट परिसरातील गावात विक्रीसाठी नेण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी त्या अगोदरच या ठिकाणी छापा टाकला आणि त्यांचे पितळ उघडे पाडले. सणासुदीचे दिवस असल्याने अनेक भेसळयुक्त पदार्थ बनवले जात असल्याने नागरिकांनी मिठाई खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.