संग्रहित छायाचित्र
पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक क्रमांक २ ने सात लाख १२ हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त केला आहे. यासोबतच ३ लाख रुपयांचा टेम्पो देखील जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
कुमेल मोहम्मद तांबोळी (वय २७, रा. जुना खडकी बाजार) आणि नवाब करीम कुरेशी (वय २७, रा. खडकी) या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश दत्तात्रय लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाच्या पोलिसांना आरोपी हे अशोक लेलँड पिकम टेम्पो मधून पुण्यामध्ये विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा पान मसाला इत्यादी प्रतिबंधित पदार्थांचा साठा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार इदगाह मैदान, खडकी बाजार या ठिकाणी सापळा लावण्यात आला. या ठिकाणी त्यांच्या टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये बंदी असलेला पान मसाला गुटखा सुगंधित तंबाखू आदी पदार्थ मिळून आले.