पुण्यात आणखी एकाची हत्या, भररस्त्यात तरुणाचा टोळक्यांकडून खून
कौटुंबिक वादातून दोन गटांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत टोळक्याने तरुणाचा खून केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील वानवडी येथील सय्यदनगरमध्ये गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. गर्दीच्या वेळी भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अजीम शेख उर्फ अंत्या (वय ३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रेहान खान उर्फ नन्नू हा भजी घेण्यासाठी गल्ली नंबर २१ येथे गेला असता होता. याठिकाणी आमिर खान याच्याशी एकमेकाकडे बघण्यातून वाद झाला. त्यातून आमिर खान याने त्याचे मित्र बोलावले, तर रेहानने देखील अल्ताफ वजीर शेख यास बोलावून घेतले. त्यानंतर गल्ली नंबर १९ मध्ये रात्री साडेदहा वाजता त्यांच्यात भांडण झाली होती.
ही भांडणे सोडवण्यासाठी गुरूवारी (दि. १७) रात्री साडेआठच्या सुमारास सादिक वेल्डरने वजीर शेख व इतर यांना सदरची भांडणे मिटवण्यासाठी त्याचे गॅरेज जवळील गल्ली नंबर ३ गुलाम अली नगर येथे बोलवले होते. मात्र, यावेळी वाद पुन्हा वाढला. त्यानंतर टोळक्यांनी तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये अजीम शेख यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी रात्री १ च्या सुमारास शिवाजीनगर येथील मंगला टॉकिजच्या परिसरात एक तरूणाचा निघृण खून कऱण्यात आला होता. १० ते १२ जणांच्या टोळक्यांनी त्याच्यावर हल्ला केला होता. या घटनेला २४ तास होत नाहीत तोच आणखी एक खून झाला आहे. वानवडी परिसरात गर्दीच्या ठिकाणी अजीम शेखची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा तिनतेरा वाजल्याचे दिसून येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी तरुणांचा खून होत असल्याने पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.