Pimpri Chinchwad : उद्योगनगरीत ‘मोका पॅटर्न’ प्रभावी, गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी चालू वर्षांत २९३ जणांवर कारवाई

नागरिकांना दिलासा आणि जलद प्रतिसाद मिळावा, यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भाग असलेल्या मावळ तालुक्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मोका पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली आहे.

Pimpri Chinchwad : उद्योगनगरीत ‘मोका पॅटर्न’ प्रभावी, गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी चालू वर्षांत २९३ जणांवर कारवाई

संग्रहित छायाचित्र

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये घट

पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच नागरिकांना दिलासा आणि जलद प्रतिसाद मिळावा, यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भाग असलेल्या मावळ तालुक्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मोका पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील शहरात चालू वर्षात तब्बल २९३ जणांवर मोका ( महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) नुसार कारवाई करण्यात आली आहे.

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरवासियांकडून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. चालू वर्षात मावळ परिसरातील आठ टोळ्यांतील तब्बल ७३ जणांवर मोका ( महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) नुसार कारवाई करण्यात आली आहे. शहरात मागील ११ महिन्यांच्या कालावधीत ३९ गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई केली आहे. आयुक्तालय स्थापनेपासून पाच वर्षांच्या कालावधीत १०२ टोळ्यांवर मोकाची कारवाई झाल्याची नोंद आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी प्रतिबंधात्मक कारवायांवर भर दिल्याने गुन्हेगारांची धावपळ सुरु झाली आहे. चौबे यांनी मागील वर्षी १४ डिसेंबररोजी आयुक्तपदाची जबाबदाी घेतली. त्यानंतर वर्षभरात त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्यामुळे गुन्हेगारी कमी होत असल्याचे आकडेवारीवरून अधोरेखित झाले आहे.

स्थानिक पोलिसांनी हातात शस्त्र घेऊन राडा घालणारे टोळके तसेच खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याव्यतिरिक्त गुन्हे शाखेच्या विविध पथकांसह पोलीस ठाण्यांच्या तपास पथकांनाही ‘ॲक्टिव्ह’ करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगार गजाआड होण्याचेदेखील प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

पोलीस ठाणेनिहाय हिस्ट्रिशिटर गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्यावर वॉच ठेवल्याने दरम्यानच्या काळात याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. जामिनावर बाहेर आलेले पुन्हा गुन्हेगारी कृत्याकडे वळतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या हालचालीवर विशेष लक्ष ठेवले आहे. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट, डीपी, प्रोफाइल, कमेंट यावरही पोलिसांची बारीक नजर आहे. त्यामुळे सोशल मीडियातून दहशत पसरविणाऱ्यांवरही कारवाईचे प्रमाण वाढले आहे.

पोलीस आयुक्तालयांतर्गत जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांमध्ये यंदा खूनप्रकरणी ५४ गुन्हे दाखल आहे. याच कालावधीत २०१९ मध्ये ५८, २०२० मध्ये ५५, २०२१ मध्ये ६८ तर २०२२ मध्ये ६७ गुन्हे खून प्रकरणी दाखल झाले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी याच कालावधीत यंदा ९४ गुन्हे दाखल झाले तर, २०१९ मध्ये ७८, २०२० मध्ये ४६, २०२१ मध्ये ९७ तसेच २०२२ मध्ये १०३ गुन्हे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल झाले. यावरून यंदा गुन्हे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या विविध उपाययोजनांमुळेच गुन्हेगारी नियंत्रणात येत असल्याचे दिसून येते.

गुन्हे दाखल करून त्यांची उकल करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी सूचना केली. त्यामुळे गुन्ह्यांची उकल होऊन  कारवाईचे प्रमाण वाढले. परिणामी गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. तळेगाव दाभाडे येथील किशोर आवारे यांचा खून तसेच शिरगाव येथील सरपंचाचा खून या दोन घटनांनी मावळ तालुका हादरला होता. यासह पिंपरी-चिंचवड, म्हाळुंगे एमआयडीसी आणि चाकण येथे देखील खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडले. मात्र, पोलिसांनी तपासचक्र फिरवत संशयिताना गजाआड केले.

बालगुन्हेगारीवर नियंत्रण

शहरातील अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण जास्त होते. अशा दिशा भरकटलेल्या अल्पवयीन मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. समुपदेशन, शिक्षण, रोजगारासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. खेळातही या मुलांना सहभागी करून घेतले जात आहे. त्यामुळे गुन्हेगारीपासून परावृत्त होऊन ही मुले प्रवाहात येण्यास मदत होत आहे. यातून बालगुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्य होत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले की, शहर तसेच ग्रामीण पट्ट्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यावर आमचा भर आहे. प्रतिबंधात्मक कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे. यापुढेही अशा गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’ची कारवाई सुरूच राहणार आहे. पोलीस हे नागरिकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठीच आहेत, असा विश्वास शहरवासीयांमध्ये निर्माण केला. त्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर उतरून पोलिसिंग केले. परिणामी पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढला आणि गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत झाली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest